इंदिरा आवासमधील बोगस लाभार्थ्यांना लागणार ब्रेक
By Admin | Updated: August 18, 2015 00:14 IST2015-08-18T00:14:06+5:302015-08-18T00:14:06+5:30
इंदिरा आवस योजनेतील बोगस लाभार्थी म्हणून अनुदान लाटणाऱ्यांना आता ब्रेक लागणार आहे.

इंदिरा आवासमधील बोगस लाभार्थ्यांना लागणार ब्रेक
अटी, शर्ती : आधार जॉबकार्डची आवश्यकता
अमरावती : इंदिरा आवस योजनेतील बोगस लाभार्थी म्हणून अनुदान लाटणाऱ्यांना आता ब्रेक लागणार आहे. सन २०१५-१६ या वर्षात लाभार्थींच्या बँक किंवा पोस्टातील खात्यावर अनुदान पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिमच्या (पीएफएमएस) माध्यमातून जमा होणार आहे. मात्र, आता या अनुदानासाठी आधार कार्डलिंक आणि रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अनुदानासाठी आधारकार्ड अनिवार्य केले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत नवीन निधी वितरण प्रणालीनुसार केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणारा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवासचे अनुदान बँक खात्यात जमा करणार आहे. या खात्याची पीएफएमएस प्रणालीवर नोंद होणार आहे. त्यानंतर या योजनेंतर्गत गट स्तरावरुन प्राप्त झालेल्या योजनेच्या लाभार्थींच्या यादीनुसार बँक पोस्ट खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकूल मंजूर देताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली कार्यपध्दती कायम राहणार आहे. अनुदान लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी तालुका पंचायत समितीत कार्यरत सहायक लेखाधिकाऱ्यांना फर्स्ट सिग्नेटही व गटविकास अधिकाऱ्यांना सेकंड सिग्नेटरी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. डिजिटल्स कार्यान्वित करणे तसेच खंडित करण्याचे अधिकार राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवास योजनेतील सहायक संचालक (लेखा) यांना प्रदान करण्यात आले आहे.
यासाठी ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याला त्याचा लॉग ईन व पासवर्ड दिला जाणार आहे. यामध्ये प्राधिकृत अधिकारी बदली, रजा, किंवा निवृत्ती झाली तर त्यासाठी इतर अधिकाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)