राजकारण शिरल्याने रस्त्यांना ब्रेक
By Admin | Updated: December 17, 2015 00:31 IST2015-12-17T00:31:52+5:302015-12-17T00:31:52+5:30
या बांधकाम विभागाच्या तपासणी वजा अहवालावर आयुक्त गुडेवार यांचे समाधान झाले नाही.

राजकारण शिरल्याने रस्त्यांना ब्रेक
अमरावती : या बांधकाम विभागाच्या तपासणी वजा अहवालावर आयुक्त गुडेवार यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सुमारे २० कोटी रुपये निधीतून हे सहाही प्रमुख रस्ते निर्मित होत असताना या रस्त्यांचा दर्जा चांगला असावा, यासाठी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून आॅडिट करुन घेतले जात आहे. तर दुसरीकडे हे सहाही रस्ते ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. काही महिन्यांपूर्वी नगरोत्थान अभियानाच्या रस्ते निर्मितीवरुन आ. सुनील देशमुख विरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी असा संघर्ष देखील उभा ठाकला होता. आ. देशमुखांनी ‘गोल्डन गँग’ असा शब्दप्रयोग महापालिकेतील काही प्रमुख सदस्यांसाठी वापरला होता. परिणामी शहराचे राजकारण ढवळून निघाले होते. आ. सुनील देशमुखांनी नगरोत्थान अभियानतंर्गत सुरु असलेल्या रस्ते निर्मिती घटनास्थळी भेट देवून बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची पाहणी सुद्धा केली होती. नगरोत्थानच्या रस्ते निर्मितीत प्रचंड मोठा अपहार झाला असे राजकीय चित्र रंगले. मात्र आठ महिन्याचा कालावधी लोटला असताना संबंधित कंत्राटदारावर कोणतीच ठोस कारवाई महापालिकेने केली नाही. त्यामुळे या सहा रस्ते निर्मितीवरुन सुरु झालेले राजकारण ‘आॅडिट’ वर थांबणार काय, असे बोलले जात आहे. या पाचही रस्यांची निर्मिती करुन हे रस्ते नागरिकांसाठी सुरु व्हावे, असे अपेक्षित होते. मात्र या रस्त्यांची कामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सहा रस्त्यांपैकी एका रस्त्याचे कंत्राटदार प्रशासकीय कारणांहून महापालिकेने बदलविले आहे. मोठा गाजावाजा करुन नगरोत्थानतंर्गत सहा रस्ते निर्मितीला प्रारंभ करण्यात आले. परंतु यात राजकारण शिरल्याने रस्ते निर्मितीला ‘ब्रेक’ लावल्याचे दिसून येत आहे.