'पे अॅन्ड पार्क'ला ‘ब्रेक’!
By Admin | Updated: August 7, 2016 00:12 IST2016-08-07T00:12:33+5:302016-08-07T00:12:33+5:30
उच्च न्यायालयाचे निर्देश आणि त्याला अनुसरून गृहविभागाने पोलीस प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे महापालिकेच्या 'पे अॅन्ड पार्क'ला ब्रेक लागला आहे.

'पे अॅन्ड पार्क'ला ‘ब्रेक’!
मार्गदर्शन मागविले : उड्डाणपुलाखाली ‘नो’ पार्किंग
अमरावती : उच्च न्यायालयाचे निर्देश आणि त्याला अनुसरून गृहविभागाने पोलीस प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे महापालिकेच्या 'पे अॅन्ड पार्क'ला ब्रेक लागला आहे. यासंदर्भात ९ आॅगस्ट रोजी पालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक होत आहे. त्या बैठकीतील निर्णयाअंती 'पे अॅन्ड पार्किंग'च्या प्रयोगाचे भवितव्य ठरणार आहे.
उच्च न्यायालय आणि गृहविभागाच्या आदेशाला अनुसरून शहरातील उड्डाणपुलाखाली कुठल्याही प्रकारचे पार्किंग करण्यात येणार नाही. दोन्ही उड्डाणपुलाखाली पार्किंगचे ठिकाण रद्द करण्यात येत आहे, असे आदेश पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी २५ जुलै २०१६ रोजी काढले होते. या आदेशाने महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या 'पे अॅन्ड पार्क'च्या प्रयोगाला अडसर निर्माण झाला. महापालिकेने शहरातील दोन्ही उड्डाणपुलाखाली 'पे अॅन्ड पार्क' प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी दिलीे. मात्र पार्किंग संदर्भात आदेशात स्पष्टता नसल्याने महापालिकेच्या पे अॅन्ड पार्किंगला ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभाग नॉटरिचेबल
शहरातील उड्डाणपुलाखाली 'पे अॅन्ड पार्क' व्यवस्था करण्यास नाहरकत देण्यात यावे, याबाबत महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस विभागाने दोन्ही उड्डाणपुलाखाली गाळ्यांमध्ये दुचाकी-चार चाकी करीता पार्किंग व्यवस्था प्रायोगिक तत्वावर करण्यास हरकत नसल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले होते.
३९ गाळ्यांखाली 'पे अॅन्ड पार्क'
मालवीय चौक ते नमुना व गाडगेनगर ते पंचवटी चौक या उभय उड्डाणपुलाखाली ४२ गाळे पार्किंगकरिता उपलब्ध आहे. यामधील चार गाळे आॅटो स्टॅन्डकरिता राखीव आहेत. उर्वरित ३९ गाळ्यांमध्ये पे अॅन्ड पार्किंग हा प्रयोग प्रस्तावित आहे.