जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणीगणनेला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:43+5:302021-05-27T04:13:43+5:30
अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना ...

जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणीगणनेला ‘ब्रेक’
अमरावती : दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात जंग़ल, व्याघ्र प्रकल्पात प्रत्यक्ष प्राणी गणना केली जाते. मात्र, कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून प्रत्यक्ष प्राणीगणना होत नाही. त्यामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांची संख्या किती? हे निश्चित करणे कठीण झाले आहे.
वन विभाग अथवा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांची ऑनलाईन नोंदणी मागविली जाते. पंरतु, गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले आणि मे महिन्यात होणारी प्राणीगणना बंदच आहे. यंदाही बुद्ध पौर्णिमेला हीच स्थिती होती. वन विभागाने प्राणी गणना होणार नाही, असे अगोदर स्पष्ट केले आहे. प्राणी गणना ही कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर करण्यात येते. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना प्राणीगणना करता यावी, यासाठी पाणवठे परिसरात मचाणी उभारल्या जातात. सायंकाळी ४ ते सकाळी १० वाजता दरम्यान ही प्रत्यक्ष प्राणीगणा केली जाते. चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यावर नेमके कोणत्या प्रकारातील पक्षी, प्राणी आढळून आले, याची माहिती प्रगणेतून नोंदविली जाते. मात्र, दोन वर्षापासून जंगल, व्याघ्र प्रकल्पात कोरोना संसर्गामुळे पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना एन्ट्री नाही. त्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष वन्यजीवांचे दर्शन कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
-------------------
प्राणी, पक्षी प्रगणनासाठी विशिष्ट फार्म
बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फार्म उपलब्ध करुन दिला जातो. पर्यावरण प्रेमी, वन्यजीव अभ्यासकांना पाणवठ्यावर प्रगणना करताना कोणत्या प्रकारचा प्राणी, पक्षी दिसून
आला याबाबतची नाेंद चित्रासमाेर करावी लागते. पक्षी, प्राण्यांची ओळख करुन तो कोणत्या प्रजाती, प्रकारातील आहे, याचे अवलोकन केले जाते. जंगल अथवा व्याघ्र प्रकल्पात वन बीटनिहाय ही प्रगणना होते. पुढे वन परिक्षेत्र, विभाग नंतर राज्यस्तरावर माहिती गोळा करुन वन्यप्राणी, पशूल पक्षांची आकडेवारी निश्चित केली जाते. मात्र, दोन वर्षात प्रगणना झाली नसल्याने वन्यजीवांची संख्या नेमकी किती, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
-----------
कोरोना संसर्गामुळे जंगल, व्याघ्र प्रकल्पात प्रवेश मनाई आहे. त्यामुळे यंदा जंगलात बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना झाली नाही. वरिष्ठाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वडाळी, पोहरा जंगलासाठी हीच नियमावली आहे.
- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी