तुरीच्या भावात विक्रमी घसरण
By Admin | Updated: December 22, 2016 00:30 IST2016-12-22T00:30:55+5:302016-12-22T00:30:55+5:30
काही दिवसांत नवीन तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर तुरीचे भाव कमालीचे गडगडले आहेत.

तुरीच्या भावात विक्रमी घसरण
सहा महिन्यांत निम्म्याने घट : व्यापाऱ्यांचे चांगभले, शेतकरी अडचणीत
अमरावती : काही दिवसांत नवीन तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर तुरीचे भाव कमालीचे गडगडले आहेत. जून-जुलै महिन्यात दहा हजारापर्यंत गेलेले तुरीचे भाव आता ४५०० रूपयांपर्यंत घसरले आहे. किंबहुना ४५०० ते ५ हजार रूपयांपर्यंत स्थिरावले आहे. त्यामुळे नवीन तूेर बाजारात आल्यावर कोणते दर राहतील, याची चिंता शेतकऱ्यांना सताऊ लागली आहे.
मागील तीन वर्षांत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असताना तुरीने शेतकऱ्यांना थोडाफार आधार दिला होता. यंदा पावसाळा समाधानकारक असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीला पसंती दिली गेली. पेरणीच्या दोन महिन्यात संततधार पावसामुळे ५० हजारावर हेक्टरमध्ये तूर पिकावर ‘मर’ रोग आला. यामधून शेतकरी सावरला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तूर बहरली. परंतु आता कोसळलेल्या भावाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. यंदाची नवीन तूर बाजारात येण्याच्या मार्गावर असताना दररोज दर कोसळणे सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी तुरीचा भाव १० हजारावर व तूरडाळ १७५ रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. आता मात्र तुरीला कवडीमोल भाव आहे. देशाच्या सर्वच भागात तुरीचे पीक चांगले आहे. सध्या तुरीला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नाही. त्यामुळे तुरीचे दर गडगडल्याचे व्यापारी सांगतात. यंदा सोयाबीन, कपाशी पाठोपाठ तुरीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीपात धारणी तालुक्यात ६,७०० हेक्टर, चिखलदरा १३२६, अमरावती ९९८०, भातकुली ९२१८, नांदगाव ९५९५, चांदूररेल्वे ६५८२, तिवसा ४५२१, मोर्शी ९०००, वरुड ८२४०, दर्यापूर ९३५५, अंजनगाव सुर्जी ४९७३, अचलपूर ६१२६, चांदूरबाजार ९३९२ व धामणगाव तालुक्यात ६६९६ हेक्टर पीक सध्या शेंगा फस्त होण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर आहे.
दरवाढीवर आंदोलन करणारे आता आहेत कुठे?
तुरीचे भाव सहा महिन्यांपूर्वी ९५०० ते १०,००० रुपये प्रतिक्विंटल व तुरडाळीचे भाव १७५ रुपये किलो झाले होते. त्यावेळी अनेक संघटनांनी आंदोलने केलीत. आता तुरीचे भाव कवडीमोल आहेत. शेतकऱ्यांच उत्पादनखर्च निघण्याची सुतराम शक्यता नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडीत आहेत. परंतु, कोणत्याही पक्षाने भाववाढीसाठी आंदोलन केले नाही.
भाव आणखी कोसळणार
सहा महिन्यांपूर्वी १० हजार क्विंटलपर्यंत दरवाढ झालेल्या तुरीला सध्या ४५०० रुपये भाव मिळत आहे. परंतु हा सर्व जुना माल आहे. शेतकऱ्यांचा नवीन माल महिनाभरात बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तुरीचे भाव आणखी कोसळू शकतात. शासनाने तुरीच्या दरांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शालेय पोषण
आहारात तूर परतली
महागल्याने शालेय पोषण आहारातून तूरडाळ बेपत्ता झाली होती. त्याऐवजी अन्य डाळींचा वापर होत होता. वर्षभरानंतर विद्यार्थ्यांच्या आहारात तूर डाळ परत आली आहे. यापूर्वी चवळी, चणा, मूग, मटकी, मसूर डाळीचा वापर करण्यात येत होता.