वीर हवेत, तर वीरमाताही हव्यात !
By Admin | Updated: May 10, 2015 00:40 IST2015-05-10T00:40:38+5:302015-05-10T00:40:38+5:30
‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा ...

वीर हवेत, तर वीरमाताही हव्यात !
अमरावती : ‘बालसंगोपन हे महिलांचे महान राष्ट्रकार्य’ असे समजून चालले तरी, या मातांना जर वीरवृत्तीचा, राष्ट्रीय भावनेचा किंवा समाजसेवोच्या तत्परतेचा स्पर्श झालेला नसेल, त्यांच्यात हे संस्कार बाणलेले नसतील, तर आपल्या बालगोपालांत त्यांची पेरणी त्या करू शकणार नाहीत. मातेच्या दुधातून ते अमृताचे घोट त्यांना मिळाल्याशिवाय राष्ट्रात ती तेजस्वीता कायम राहणार नाही. तिच्यात अंशत: का होईना, असे संस्कार आल्याशिवाय तिच्या जन्माला येणाऱ्या सुपुत्रात त्यांचा पुरेपूर विकास होणे शक्य नाही.
जगाच्या इतिहासावर दृष्टी टाकल्यास आपणास दिसून येईल की, जे पुरुष वीर, संत, मुत्सद्दी, समाजधुरीण किंवा श्रेष्ठ म्हणून गाजले आहेत, त्यांच्या मातांमध्ये ते गुण, बीजरुपाने वसत होते. वीरप्रसू वीरमाता ह्या अत्यंत तपस्वीनी व प्रतिकारासाठी सज्ज अशा रणचंडिका होत्या. वीर भरताची माता शकुंतला आणि छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जीजाबाई इत्यादीकांच्या उदाहरणावरुन हे सहज कळून येईल. तशी कितीतरी उदाहरणे आमच्या भरतवर्षातीलच देता येण्यासारखी आहेत, अर्थात् राष्ट्रात महापुरुष निर्माण होण्यासाठी ‘पहिले तो करी देवकी जैसी माताएँ जगमे पैदा’ यांची जोड करुन देणे हे तितकेच आवश्यक आहे. ‘तुम्ही आपले घर सांभाळा म्हणजे झाले’ एवढेच स्त्रियांना शिकवून भागणार नाही. घर आणि राष्ट्र यांचा अविभाज्य संबंध लक्षात घेऊन आपणास घरातूनच सर्व गोष्टींना आरंभ केला पाहिजे. तुळशीसमोर रांगोळी घालताना चक्र काढूनच भागणार नाही तर त्यांना चक्राचा प्रत्यक्ष व्यवहारी उपयोग करण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले आहे. स्त्रीचे घरातील-समाजातील स्थान आणि विशेष म्हणजे माता या नात्याने स्त्रीचे कर्तव्य याबाबतही श्री गुरुदेवांनी परिणामकारक विचार व्यक्त केले आहेत. श्रीगुरुदेव या मासिकामध्ये सन १९४७ च्या एप्रिल महिन्यात राष्ट्रसंतांचे प्रसिद्ध झालेले विचार जागतिक मातृत्त्वदिनाच्या निमित्ताने खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी येथे देत आहोत...