शहरातील खड्ड्यांवर मंथन

By Admin | Updated: August 18, 2015 00:22 IST2015-08-18T00:22:01+5:302015-08-18T00:22:01+5:30

येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव साजरा केला जाणार असून शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर महापालिकेत सदस्यांनी मंथन केले.

Brainstorm on the pits in the city | शहरातील खड्ड्यांवर मंथन

शहरातील खड्ड्यांवर मंथन

गणेशोत्सवापूर्वी बुजविण्याचा निर्णय : जेट पॅचर मशीनचा वापर होणार
अमरावती : येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव साजरा केला जाणार असून शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर महापालिकेत सदस्यांनी मंथन केले. सार्वजनिक गणेशोत्सव व धार्मिक उत्सव साजरा करताना मंडप, बुथ उभारणीबाबतचे जुनेच धोरण लागू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र रस्त्यांवरील खड्डे हे जेट पॅचर मशीनने बुजविले जातील, असा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सार्वजनिक गणेशोत्सवात मंडप, बुथ उभारणी करताना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता प्रशासकीय विषय क्र. ७३ अन्वये धोरण निश्चितीवर चर्चा करण्यात आली. परंतु गणेशोत्सवात मंडप, बुथ उभारणीसाठीचे धोरण हे जुन्या नियमानुसारच करण्यात यावे, यासाठी विलास इंगोले, तुषार भारतीय, दिंगबर डहाके, प्रवीण हरमकर, प्रशांत वानखडे यांनी पुढाकार घेतला. दरम्यान गणेशोत्सव सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु न झाल्याबद्दल सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावेळी जावेद मेमन, सुनील काळे, प्रकाश बनसोड यांनी बडनेरा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांना कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढले. या खड्ड्यांबाबत आमदारांनी का मौन बाळगले? हा संशोधनाचा विषय असल्याचे विलास इंगोले म्हणाले. प्रकाश बनसोड, अर्चना इंगोेले, संजय अग्रवाल, राजू मसराम, विजय नागपुरे, कांचन ग्रेसपुंजे, दिनेश बूब, अजय गोंडाणे, मंजुषा जाधव, गुंफाबाई, छाया अंबाडकर, दीपक पाटील, चंदुमल बिल्दाणी, राजू मानकर, अंबादास जावरे आदींनी त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची समस्या मांडली. खड्डे पडले असताना ते बुजविण्यासाठी मुरुम कधी मिळणार हेदेखील सदस्यांनी आवर्जून मांडले. गणेशोत्सव दरम्यान उभारले जाणारे मंडप, बुथ आदींचे धोरण ठरविणाचा विषय असताना तो खड्ड्यावर पोहचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जावेद मेमन यांनी बडनेरा मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले नाही तर अधिकाऱ्यांना यामध्ये बसवू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रभारी शहर अभियंता जीवन सदार यांनी गणेशोत्सवापुर्वीच रस्त्यावर पडलेले खड्डे, विसर्जनाचे मार्ग सुधारले जातील, असे आश्वासित केले. (प्रतिनिधी)

- तर खड्डे बुजविण्यासाठी मशीन घेऊ- आयुक्त
रस्त्यावर वारंवार पडत असलेले खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर मशीनचे देयके एक कोटींचा वर दिले जातात. त्यामुळे महापालिकेत गेट पॅचर मशीन खरेदी केल्यास वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत होईल. १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून मशीन खरेदी करण्याचा मानस आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला.

जसवंते, पुसतकर यांची नियुक्ती
महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर लागलेले कनिष्ठ लिपिक स्वप्निल जसवंते, भूषण पुसतकर यांची शैक्षणिक पात्रतेनुसार अनुक्रमे मोटार व कार्यशाळा विभागात कनिष्ठ अभियंता तर जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जसवंते, पुसतकर यांच्याक डे यापूर्वी प्रभार सोपविण्यात आला होता. मात्र आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पात्रतेनुसार दोघांचीही नियुक्ती करून न्याय दिल्याची प्रतिक्रिया बहुतांश सदस्यांनी व्यक्त केल्यात. अन्य पात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरही चर्चा करण्यात आली. नियुक्तीत स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांची मोलाची भूमिका ठरली.

Web Title: Brainstorm on the pits in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.