मुलगा कर्तव्य विसरल्याने अपंग पिता वाऱ्यावर
By Admin | Updated: March 20, 2016 00:19 IST2016-03-20T00:19:50+5:302016-03-20T00:19:50+5:30
दारुमुळे व्यसनाधीन मुलाचे जन्मदात्यावर दुर्लक्ष असल्याने अपंग आलेल्या या पित्याला दारोदार भीक मागून पोट भरण्याचा प्रसंग ओढावला आहे.

मुलगा कर्तव्य विसरल्याने अपंग पिता वाऱ्यावर
दर्यापूर आगारात मागतात भीक
शुभम बायस्कार दर्यापूर
दारुमुळे व्यसनाधीन मुलाचे जन्मदात्यावर दुर्लक्ष असल्याने अपंग आलेल्या या पित्याला दारोदार भीक मागून पोट भरण्याचा प्रसंग ओढावला आहे. मानुसकीला काळिमा फासणारे हे दृश्य दर्यापूर आगारात फेरफटका मारला असता नजरेत भरले.
माणूस जेव्हा पूर्णपणे हतबल होतो, त्याच्याकडून कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, तेव्हा जवळचे नातलगही त्यांना दूर लोटतात. एक असेच गृहस्थ दर्यापूर आगारात नियमित येतात. नागरिकांना भिक्षा मागतात. देवराव मिस्तकर असे त्यांचे नाव असून ते दर्यापूरनजीकच्या बाभळीत राहतात. त्यांना एक मुलगादेखील आहे. परंतु तो व्यसनाच्या आहारी गेल्याने वडिलांवर ही वेळ आली आहे. दररोज सकाळ झाली की, पहिल्या गाडीने ते बसस्थानक परिसरात येतात. अन् सायंकाळच्या गाडीने परत जातात. दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांजवळून गोळा झालेल्या पैशात ते टिचभर पोटाची खळगी भरतात. समाजात जर कुणाला अपंगत्व आले असेल तर त्यात त्याची चूक नसते, जीवनात घडलेला तो एक अपघात असतो. समाजानेदेखील दायित्वाचा भाग म्हणून या वयोवृद्धाला आसरा देणे गरजेचे आहे.