आईपाठोपाठ मुलगाही स्वाईन फ्लूने दगावला
By Admin | Updated: February 17, 2015 00:52 IST2015-02-17T00:52:23+5:302015-02-17T00:52:23+5:30
अमरावती : स्थानिक एकनाथपुरम येथील रहिवासी शारदादेवी चौधरी यांचा पाचच

आईपाठोपाठ मुलगाही स्वाईन फ्लूने दगावला
अमरावती : स्थानिक एकनाथपुरम येथील रहिवासी शारदादेवी चौधरी यांचा पाचच दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्या पाठोपाठ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांचा ३० वर्षीय तरुण मुलगा राहुलदेखील स्वाईन फ्लूने दगावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने चौघांचा बळी घेतला आहे. एकनाथपुरम येथील शारदादेवी चौधरी यांच्यावर काही दिवसांपासून नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांना भेटण्याकरिता त्यांचे काही नातेवाईक नागपूर येथील रुग्णालयात गेले होते. मुलगा राहुलसुध्दा आईच्या भेटीवाचून राहू शकला नाही. त्यालाही या जीवघेण्या आजाराने घेरले आणि आईपाठोपाठ राहुललादेखील या आजाराने कवेत घेतले. कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळला. राहुल हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुलला उलट्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे २६ जानेवारी रोजी त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई व मुलगा दोघांवरही तेथेच उपचार सुरु होते. राहुलच्या छातीत गंभीर वेदना होत होत्या. तपासणीअंती स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली. राहुलच्या घशातील द्रव तपासणी केल्यावर डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची पुष्टी केली. उपचार सुरु असतानाच त्याची प्रकृती अधिकाधिक गंभीर होत गेली. आईचीही प्रकृती गंभीर होतीच. डॉक्टरांनी दोघांनाही वाचविण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र आई १० फ्रेब्रुवारीला जग सोडून गेली. नातेवाईकांनी शारदादेवीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. रविवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी राहुलची प्रकृती बिघडली असता नातेवाईक त्याला मुंबई येथे हलविण्याच्या विचारात होते. मात्र सायंकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अमरावतीला आणण्यात आला. स्वाईन फ्लूची दक्षता घेत नागरिकांनी सोमवारी राहुलच्या मृतदेहावर हिन्दू स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. मायलेकाच्या पाठोपाठ मृत्यूने अख्खे शहर हळहळले. (प्रतिनिधी)