सिलिंडरचा भडकादोन विद्यार्थिनी भाजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:07 IST2017-01-11T00:07:00+5:302017-01-11T00:07:00+5:30

सिलिंडरच्या भडक्याने दोन विद्यार्थिनी भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गाडगेनगर परिसरातील संजीवनी कॉलनीत घडली.

The bottle of cylinders gets burnt | सिलिंडरचा भडकादोन विद्यार्थिनी भाजल्या

सिलिंडरचा भडकादोन विद्यार्थिनी भाजल्या

संजीवनी कॉलनीतील घटना : गाडगेनगर परिसरात खळबळ
अमरावती : सिलिंडरच्या भडक्याने दोन विद्यार्थिनी भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गाडगेनगर परिसरातील संजीवनी कॉलनीत घडली. रिना अशोक ठाकरे (२२) व पूनम भय्यासाहेब विधळे (२२, दोन्ही रा. साऊर, ह.मु.संजीवनी कॉलनी) अशी भाजलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. याघटनेमुळे गाडगेनगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
साऊर येथील मूळ रहिवासी रिना ठाकरे व पूनम विधळे या शिक्षणासाठी अमरावतीत राहात आहेत. दोघीही एकाच गावातील असल्यामुळे त्यांनी संजीवनी कॉलनी येथील रहिवासी रवी नारायण झामरे यांच्याकडे भाड्याने राहतात. दोघीही शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात फोटोग्राफी अ‍ॅन्ड व्हिडिओग्राफीच्या प्रथम वर्षाला शिकत आहेत. महाविद्यालयातून आल्यानंतर रूममध्येच त्या स्वयंपाक करतात. त्यामुळे त्यांच्या खोलीमध्ये भरलेले गॅस सिलिंडर होते. सोमवारी रात्री दोघीही अभ्यास करून झोपल्या. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्या स्वयंपाकाच्या तयारीत होत्या.

नागरिकांनीच विझविली आग
अमरावती : ११.३० वाजताच्या सुमारास गॅस पेटवित असताना अचानक सिलिंडरचा भडका उडाला. जोरदार आवाजामुळे घरमालकासह परिसरातील नागरिकांनी तत्काळ विद्यार्थिनी राहात असलेल्या खोलीकडे धाव घेतली. दोघीही गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी तत्काळ याघटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. झामरे यांनी काही नागरिकांच्या मदतीने दोघींनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. याघटनेत रिना ठाकरे ही ४० टक्के तर पूनम विधळे ही ३१ टक्के भाजली आहे. दोघींवरीही जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण
सिलिंडर स्फोटाची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच फायरमन इंगोले, उताणे, मुंदेसह वाहनचालक विजय पंधरे घटनास्थळी पाण्याचा बंब घेऊन पोहोचले. मात्र, तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद केली आहे.

सुरक्षेचे असे करा उपाय
घरातील गॅस सिलिंडरचा उपयोग करताना काळजी घेतल्यास आगीच्या घटना टाळता येऊ शकतात. गॅसच्या नळीवर ओरखडे दिसल्यास तत्काळ सिलिंडरची नळी बदलून घ्यावी. गॅसची नळी ‘आयएसआय मार्क’ची असल्याची शहानिशा करा. रेग्युलेटरमध्ये काही बिघाड जाणवल्यास तत्काळ गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. शेगडीमध्ये जराही बिघाड जाणवल्यास पुन्हा-पुन्हा शेगडी पेटविण्याचा प्रयत्न करू नये, सिलिंडरमधून दुर्गंधी येत असल्यास लायटर अथवा काडीपेटीने शेगडी पेटवू नये, तत्काळ घराच्या दारे व खिडक्या उघडाव्यात. गॅसगळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास विद्युत उपकरणे चालू किंवा बंद करू नये, आग लागताच माती, रेती, पाणी किंवा पोते ओले करून आगीवर टाकावे आग विझविण्याचे यंत्र असल्यास त्याचा उपयोग करावा, अशी माहिती टान्सपोर्टनगर अग्निशमन उपकेंद्र प्रमुख सय्यद अन्वर यांनी दिली.

आगीच्या तीव्रतेने फुटल्या खिडकीच्या काचा
सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे हा भडका उडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगीच्या तीव्रतेने खोलीतील खिडकीच्या काचा देखील फुटल्या. त्या बाहेर रस्त्यापर्यंत उडाल्या होत्या. भडक्यानंतर झालेल्या आवाजाने परिसर हादरून गेला होता.

स्वयंपाक करताना सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे भडका उडाला आणि दोन्ही विद्यार्थिनी भाजल्या. या घटनेची नोंद जळीत वहीत घेण्यात आली असून मुलींचे बयाण नोंदविण्यात आले आहे.
-के.एम.पुंडकर,
पोलीस निरीक्षक,
गाडगेनगर ठाणे

Web Title: The bottle of cylinders gets burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.