बोराळा-भिलखेडा रस्ता जड वाहनांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:46+5:302021-01-08T04:36:46+5:30
चिखलदरा : मेळघाटातील रस्ते दुरुस्तीबाबत परवानगीचा पेच असताना, दुसरीकडे जड वाहतुकीमुळे रस्ताच खड्डेमय झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासींच्या ...

बोराळा-भिलखेडा रस्ता जड वाहनांसाठी बंद
चिखलदरा : मेळघाटातील रस्ते दुरुस्तीबाबत परवानगीचा पेच असताना, दुसरीकडे जड वाहतुकीमुळे रस्ताच खड्डेमय झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासींच्या आरोग्यहिताच्या मुद्द्यावर तालुक्यातील बोराळा-भिलखेडा मार्गावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तसे फलक जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एक ठिकाणी लावले आहे. वाहन दिसल्यास कारवाई केली जाणार आहे.
तालुक्यातील प्लेन पट्टा म्हणून ओळख असलेल्या तेलखार, टेंब्रुसोंडा, गौरखेडा बाजार परिसरात भिलखेडा व इतर ठिकाणी महसूल विभागाच्या गौण खनिजाच्या खदानी आहेत. या खदानींमधून दर्यापूर, मूर्तिजापूर व अंजनगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज जड वाहनांमधून नेले जाते. त्यामुळे आदिवासी पाड्यांना जाणारा हा मुख्य मार्ग पूर्णतः खड्डेमय झाला आहे. त्यातूनच दळणवळणासही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने परिसरातील आदिवासींनी सदरची तक्रार जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील या मार्गावरून जड वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार बांधकाम विभागाच्यावतीने सदर रस्त्यावरील जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याचे फलक लावण्यात आले. दुसरीकडे पोलिसांतसुद्धा जड वाहतुकीवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राहुल शेंडे यांनी सांगितले.