कोल्हापुरी बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान
By Admin | Updated: October 27, 2015 00:20 IST2015-10-27T00:20:52+5:302015-10-27T00:20:52+5:30
लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले.

कोल्हापुरी बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान
हरित क्रांती : शेतकरी, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन
मोर्शी : लघु सिंचन विभागाच्या मोर्शी उपविभागातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी यावर्षी अडविले. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली. दुसरीकडे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाट्या चोरीला जाऊ नये, यासाठी नागरिकांनी आणि विशेषत: शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता अभिमन्यू वडेर यांनी केले.
मूळचे कोल्हापूर येथील राहणारे उपविभागीय अभियंता वडेर यांना कोल्हापुरी बंधाऱ्याच्या व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे. वरुड येथे झालेल्या कृषी मेळाव्यात आमदार बोंडे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थिती पाहता यावर्षी लवकर पाणी अडविण्याची आवश्यकता विशद केली होती. हे पाहता उपविभागीय अभियंता वडेर यांनी वरुड तालुक्यातील आमनेर, मोर्शी तालुक्यातील पाळा, उदखेड, खेड येथील विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यासोबतच पाळा व सालबर्डी येथील पाणी वापर संस्थांना हस्तांतरित केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याची योजना शाखा अभियंता नितीन ठाकरे व प्रदीप देशामुख यांच्या सहकार्याने कार्यान्वित केली. पाणी वापर संस्थांच्या बैठकी घेऊन त्यांना तातडीने पाणी अडविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी पाट्या टाकण्यात आल्याने सध्या या सर्वच बंधाऱ्यांत पूर्ण क्षमतेएवढे पाणी थांबविले गेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाट्यांचे संरक्षण करण्याच्या सूचना !
कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाट्या बांधासमोरील शेतकरी, वाळूमाफिया काढून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या लोखंडी पाट्या चोरटे चोरुन नेण्याचीही भीती आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कोल्हापुरी बांधाच्या या पाट्यांचे संरक्षण करण्याचे आणि त्याकरिता गावातील सरपंच यांच्या मदतीने सुकाणू समिती नेमून बंधाऱ्याच्या संरक्षणाकरिता गस्ती पथक निर्माण करण्याची सूचनाही यावेळी उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.
सिंचनाची सोय झाली
बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले गेल्यामुळे आमनेर बंधाऱ्यातून ९६ हेक्टर, खेड बंधाऱ्यातून २७ हेक्टर, पाळा-१ बंधाऱ्यातून ८६ हेक्टर, उदखेड बंधाऱ्यातून १७ हेक्टर, सालबर्डी बंधाऱ्यातून ५१ हेक्टर आणि पाळा-२ कोल्हापूरी बंधाऱ्यातून ९० हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. या सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता अभिमन्यू वडेर यांनी केले आहे.