जलसिंचन योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

By Admin | Updated: December 8, 2015 00:16 IST2015-12-08T00:16:45+5:302015-12-08T00:16:45+5:30

जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळात पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर होता.

A boon for farmers for irrigation scheme | जलसिंचन योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

जलसिंचन योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

शेतकरी सुखावला : तीन हजार एकर जमीन ओलिताखाली
प्रशांत काळबेंडे वरूड
जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळात पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर होता. शरद उपसा जलसिंचन नावाचा दूरदर्शी प्रकल्प येथे निर्माण झाला. या प्रकल्पाने शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली. तर, संपुर्ण परिसरात हरितक्रांती केली. शरद उपसा जलस्ािंचन योजनेमुळे बागायदार शेतकऱ्यांना उभारी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. सुमारे तीन हजार एकर जमीन या योजनेमुळे ओलिताखाली आली आहे.
सन १९९०-९५ या काळात जरूड परीसरात अती वापरामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सुमारे १२०० ते १५०० फूट खोल बोअर करून शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. जमिनीला चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नव्हता. त्यांची आर्थिक स्थिती खालावत होती. संगोपन केलेल्या संत्रा बागा डोळ्यादेखत उध्वस्त होत असतांना अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुध्दा केल्यात.त्यावर शरद उपसा योजना रामबाण ठरली.
शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढली. वाळलेल्या संत्रा झाडांना नवसंंजीवनी देवून आज आंबिया बहाराच्या माध्यमातून जरुड परिसरात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. जिल्ह्यात संत्र्याच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपस्याचे पाणी व जरूडचे शेतकरी करतात. एकेकाळी आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी दिली आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होऊन परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा विदेशात पोहोचला.
यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी आपल्या शेती गहान ठेवून निर्माण केलेली ७५ मीटर उंची आणि १३ किलोमीटर लांबीची शेतीला पाणी देणारी विदर्भातील एकमेव शरद उपसा जलसिंचन योजना आज सुस्थितीत आहे. त्या काळचे विरोधकही तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या या दुरदर्शी योजनेला धन्यवाद देतात. वरुड तालुक्यात संपूर्ण मतदारसंघात ‘‘पाणी अडवा पाणी जिरवा’’ या मोहिमेअंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, कोल्हापुरी शेतबंधाऱ्याच्या कामांची मोहीम राबवून पाण्याची पातळी उंचावण्याचे काम केले. या मोहिमेला काही प्रमाणात यश देखील प्राप्त झाले.
ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे. दूरदर्शी निर्णय घेऊन सुरू केलेल्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे फलित पाहून राज्यातील काही आमदार देशमुख यांच्या कामाची प्रेरणा घेऊन ती कामे सामोरे नेत आहेत.
शरद उपसा सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत असल्याने त्यांच्या शेतात उत्पादन देखील चांगले होत आहेत. त्यामुळे त्यांना शेती व्यवसायातून उभारी मिळाली आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प आता ठिकठिकाणी निर्माण करणे गरजेचे आहे.
निसर्गावर अवलंबून राहणे आता शक्य नसल्याने तलावांची मोठ्या प्रमाणात निर्माणकार्य हाती घेणे अनिवार्य झाले आहे. तेव्हाच जगाचा पोशिंदा ताठ मानेने जगेल , असा आशावाद तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतच मिळेल.

Web Title: A boon for farmers for irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.