बोंडेंना अटकपूर्व जामीन, लेखणीबंद मागे
By Admin | Updated: October 6, 2016 00:29 IST2016-10-06T00:29:15+5:302016-10-06T00:29:15+5:30
वरुडच्या नायब तहसीलदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आ. अनिल बोंडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

बोंडेंना अटकपूर्व जामीन, लेखणीबंद मागे
नायब तहसीलदाराला मारहाण प्रकरण : गुरुवारपासून नियमित कामकाज
अमरावती : वरुडच्या नायब तहसीलदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आ. अनिल बोंडे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन मागे घेण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेच्या २५० अर्जात त्रुटी असल्यामुळे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्याशी वाद घालीत आ. अनिल बोंडे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली.
काळे यांनी वरुड ठाण्यात केलेल्या तक्रारीवर आ. अनिल बोंडे यांचेविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. त्यामुळे संतप्त महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा व विभागात लेखणीबंद आंदोलन सुरू केले.
दरम्यान मंगळवारी आ. बोंडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय (५) मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावर न्यायाधीश विमलनाथ तिवारी यांनी बुधवारी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतला व गुरुवारी २५ हजारांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
त्यामुळे न्यायालयाचा सन्मान ठेवत महसूल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन मागे घेतले. त्यामुळे ६ आॅक्टोंबर गुरुवारपासून महसूल विभागाचे कामकाज नियमित सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे अभिनंदन
माजी सैनिक व कार्यकारी दंडाधिकारी असलेले नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना भाजपाचे उच्चविद्याविभूषित आ. अनिल बोंडे यांनी मारहाण केली. या घटनेविषयीचे वास्तव बुधवारी ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या लेखणीबंद आंदोलनात तहसीलदार राम लंके यांनी ‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
न्यायालयाचा सन्मान राखीत आम्ही लेखणीबंद मागे घेत आहे. आंदोलन काळातील प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा करु.
- सुरेश बगळे,
राज्य कार्याध्यक्ष, तहसीलदार,
नायब तहसीलदार संघटना