शिक्षण विद्याशाखा ‘डीन’पदी बोगस नियुक्ती
By Admin | Updated: January 24, 2017 00:13 IST2017-01-24T00:13:36+5:302017-01-24T00:13:36+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठात्यांची (डीन) नियुक्ती बोगस असून बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षण विद्याशाखा ‘डीन’पदी बोगस नियुक्ती
कुलगुरुंचे दुर्लक्ष : प्राचार्य नसताना बनावट पत्र केले सादर
गणेश वासनिक अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठात्यांची (डीन) नियुक्ती बोगस असून बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठ परिसरात गैरप्रकार होत असताना या गंभीर बाबीला कुलगुरू केव्हा आवर घालणार, असा सवाल आता शिक्षण क्षेत्रात उमटू लागला आहे.
सद्यस्थितीत शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमांना अतिशय वाईट दिवस आले आहेत. महाविद्यालयांना बीपीएड, एमपीएडसाठी विद्यार्थीच मिळत नाहीत मग प्राध्यापक तर शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे शारीरिक शिक्षण महाविद्यालयांचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
‘पीएचडी’ संशयाच्या भोवऱ्यात
अमरावती : मात्र, या शारीरिक शिक्षण महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवणारे अधिष्ठाता एम.एच. लकडे यांची नियुक्तीदेखील बोगस असल्याचे वास्तव समोर आले आहे. विद्यापीठात ‘डीन’पदी वर्णी लावण्यापूर्वी सदर व्यक्ती ही प्राचार्य अथवा विद्यापीठाचे विभाग प्रमुख असणे अनिवार्य आहे. तसेच पाच वर्षांचे चेअरमनपदी नेमणूक असावी, हा‘डीन’च्या नियुक्तीचा निकष आहे. मात्र, यवतमाळ येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापकपदी कार्यरत एम.एच. लकडे यांची ‘डीन’ म्हणून विद्यापीठात जुलै २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती नियमबाह्य असताना तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी ‘डीन’ पदाला मान्यता दिली कशी, हादेखील संशोधनाचा विषय आहे.
विद्यापीठात शिक्षण विद्याशाखापदी लकडे हे ‘डीन’ म्हणून रूजू झाले तेव्हा त्यांनी पीएचडी देखील केली नव्हती, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राचार्य नाही, पीएचडी नाही, चेअरमनपदाचा अनुभव नाही आणि विद्यापीठाचे विभागप्रमुखही नाही, तरीही एम.एच.लकडे हे शिक्षण विद्याशाखेचे ‘डीन’ कसे, हा चिंतनाचा विषय आहे. लकडे यांची नियुक्ती बोगस असेल तर आतापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांची ‘पीएचडी’ मान्यता नोंदविली तीदेखील नियमबाह्य ठरेल, हे खरे आहे. पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात ‘डीन’ पदी बोगस नियुक्ती केली जात असेल तर अन्य कारभार कसा सुरु आहे, याबाबत न बोललेलेच बरे.
लकडेंचे प्राचार्यपदाचे पत्र बनावट
शिक्षण विद्याशाखेच्या ‘डीन’पदी वर्णी लागावी, यासाठी एम.एच.लकडे यांनी यवतमाळ येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीकडून प्राचार्यपदी नियुक्ती असल्याचे बनावट पत्र विद्यापीठात सादर केले होते. त्याच्या आधारे त्यांनी ‘डीन’ पद मिळविल्याची माहिती आहे.
‘एमपीएड’चा अभ्यासक्रम शिकवितात वीजतंत्री!
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘एमपीएड’ अभ्यासक्रम शिकविण्यासाठी तासिका तत्वावर नेमण्यात आलेले प्राधापक नसून ते वीजतंत्री असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ‘एमपीएड’साठी तासिका तत्त्वावर नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांकडे आवश्यक पदवी नसून त्यांची नियुक्ती वशिलेबाजीने करण्यात आली आहे. रोजंदारीवर कार्यरत वीजतंत्री विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देत आहेत, हे विशेष!
सन २००८ पासून प्राचार्यपदी आहे. एम.एच.लकडे हे आजही महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मात्र, लकडे हे विद्यापीठात ‘डीन’ पदी कार्यरत आहे.
- आर.एम.क्षीरसागर,
प्राचार्य, दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ
शिक्षण विद्याशाखा ‘डीन’पदी नियुक्तीचे अधिकार कुलगुरुंचे आहेत. लकडे यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल कार्यालयातून चौकशीचे आदेश आले अथवा नाही, याबाबत भाष्य करता येणार नाही.
- दि.स.राऊत, उपकुलसचिव,
विद्या विभाग, अमरावती विद्यापीठ