मोर्शी : तालुक्यात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने मोर्शी तालुक्यासाठी ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये इतकी नुकसान भरपाई मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, दिवाळीला दिलासा देण्याच्या बाता ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ ठरल्या आहेत. दिवाळीपर्व संपून पंधरवाडा उलटला असताना शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झालेली नाही.
ती मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, बाजार समिती संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, रुपेश वाळके यांनी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याकडे केली आहे. सर्वच बँक व्यवस्थापकांना त्यांच्या शाखेतील नुकसानग्रस्त शेतकरी खातेदारांचे धनादेश यादीसह देण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम प्रलंबित न ठेवता तात्काळ यादीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे.