दिवसा उकाडा, रात्री गारवा
By Admin | Updated: September 29, 2014 22:53 IST2014-09-29T22:53:19+5:302014-09-29T22:53:19+5:30
दिवसा उकाडा व रात्रीचा गारवा असे वातावरण अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. यंदा वापसा उशिरा आल्याने येत्या ८ ते १० दिवस उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दिवसा उकाडा, रात्री गारवा
वैभव बाबरेकर - अमरावती
दिवसा उकाडा व रात्रीचा गारवा असे वातावरण अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. यंदा वापसा उशिरा आल्याने येत्या ८ ते १० दिवस उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्यंतरी पावसाने दांडी मारली. तसेच सप्टेंबरमध्ये ऊन्ह, पाऊस व ढगाळ वातावरण दिसून आले. मात्र काही दिवसांपासून पाऊस अचानक बंद झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे उकाडा निर्माण झाला आहे. तापमान ३५ डिग्री सेल्सिअसवर पोहचल्याने जमिनीतील पाण्याची वाफ तयार व्हायला लागली आहे. या वाफेमुळे उकाड्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही वाफ रात्रीच्या वेळेस थंडी होत असल्यामुळे रात्री गारवा निर्माण करीत आहे. त्यामुळे रात्री काही प्रमाणात थंडीसुध्दा वाजत आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे आणि त्या बाष्पाचे रुपांतर दवबिंदूत होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वातावरणात धुकेसुध्दा निर्माण होताना दिसून येत आहे. दिवसा उकाडा व रात्री थंडी असे वातावरण तयार झाल्याने जिल्ह्यात रोगराईने तोंड वर काढल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक घरातील एक सदस्य ताप, सर्दी व खोकल्यासारख्या आजाराने ग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बहुतांश कुटुंबीयांमध्ये एक सदस्य आजाराने ग्रस्त असल्याचे निश्चितच दिसून येत आहे. हा वातावरणाचा प्रभाव असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविले आहे. कॅलेंडरनुसार जरी वापसा संपला असला तरी निसर्गातील बदलामुळे वापस्याची जाणीव होत आहे.