बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:44+5:302021-03-16T04:14:44+5:30
सर्वोदय कॉलनीतील घटना : वडील कोरोना पॉझिटिव्ह धामणगाव रेल्वे : वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या भेटीसाठी घरून निघालेल्या ...

बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत आढळला
सर्वोदय कॉलनीतील घटना : वडील कोरोना पॉझिटिव्ह
धामणगाव रेल्वे : वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या भेटीसाठी घरून निघालेल्या व शनिवारपासून बेपत्ता झालेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी ३ वाजता भिल्ली रस्त्यावरील एका विहिरीत तरंगताना आढळला. प्रथमेश अरुण गुल्हाने असे मृताचे नाव असून, तो येथील सर्वोदय कॉलनी येथे राहत होता.
प्रथमेशचे कोरोना पॉझिटिव्ह वडील अमरावती येथे एका रुग्णालयात दाखल होते. दरम्यान प्रथमेश हा शनिवारी अमरावतीला त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घरून निघाला होता. मात्र, तो अमरावतीला न पोहोचल्याने त्याचा चुलतभाऊ योगेश गुल्हाने यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी नोंदवली होती. सोमवारी दुपारी ३ वाजता भिल्ली रस्त्यावरील विवेक जोशी यांच्या शेतातील विहिरीजवळ प्रथमेशची बॅग, त्यावर त्याचा मोबाईल तसेच विहिरीत शंभर रुपयांची नोट तरंगताना आढळली. दत्तापूर पोलिसांना ही माहिती मिळताच खोल विहिरीतील पाणी पंपाने बाहेर फेकल्यानंतर त्याचा मृतदेह आढळला.
प्रथमेश हा अमरावतीच्या मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याच्या पश्चात मोठ्या दोन बहिणी व आई-वडील आहेत. वडील विरुळ रोंघे येथील माधराव वानखडे विद्यालयातून शिक्षक म्हणून निवृत्त झाले, तर आई घुईखेड येथे शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात शिक्षिका आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके घटनास्थळी रवाना झाले. या घटनेचा अधिक तपास दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडकर, बीट जमादार व्ही.एम. बघेल, सागर कदम हे करीत आहेत. प्रथमेशने आत्महत्या केली वा अन्य काही, याचा तपास दत्तापूर पोलीस करीत असल्याची माहिती येथील पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी दिली.