‘स्मार्ट सिटी’ साठी विकासाची ब्ल्यू प्रिंट
By Admin | Updated: October 15, 2015 00:22 IST2015-10-15T00:22:27+5:302015-10-15T00:22:27+5:30
‘स्मार्ट सिटी’त अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा अनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या कार्यशाळेतून महापालिकेने विकासाची ब्ल्यू प्रिन्ट ठरविली.

‘स्मार्ट सिटी’ साठी विकासाची ब्ल्यू प्रिंट
कार्यशाळा : अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधींचा सहभाग
अमरावती: ‘स्मार्ट सिटी’त अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा अनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या कार्यशाळेतून महापालिकेने विकासाची ब्ल्यू प्रिन्ट ठरविली. भविष्यातील विकास कामे ही लोकाभिमुख असावी, असे मत अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधींनी मांडले.
येथील शेगाव नाका स्थित अभियंता भवनमध्ये दोन सत्रात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजित कौर नंदा यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी खा. आनंदराव अडसूळ होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पोलीस आयुक्त राजुकमार व्हटकर, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विचार मांडताना ‘स्मार्ट सिटी’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी असून त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य देताना विकास कामात सामान्य माणूस यात अंतर्भाव असावा, ही बाब आवर्जून मांडण्यात आली. ब्ल्यू प्रिन्ट ही वास्तविकपणे उतरविण्यासाठी महापालिका पुढाकार घेत असल्याचे कौतूकही करण्यात आले.
यावेळी ‘स्मार्ट सिटी’चा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अलिया कन्सलटिंग कंपनीचे प्रियेश तितरे, सुशील पाठक, निकिता डिक्रुज यांनी प्रात्यक्षिक सादर करुन भविष्यातील अमरावती महानगर कसे असेल, ही बाब समजावून सांगितली. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महापौर चरणजित कौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता प्रकाश बनसोड, गुंफाबाई मेश्राम आदी लोकप्रतिनीधी हजर होते.