निर्धनांना फटके, सधनांना अभय
By Admin | Updated: July 6, 2016 23:56 IST2016-07-06T23:56:46+5:302016-07-06T23:56:46+5:30
शहरात बुधवारी गाडगेनगर, इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, कॅम्प, वेलकम पॉर्इंट, पंचवटी, राजापेठ, मालटेकडी परिसरात राबविण्यात आलेल्या....

निर्धनांना फटके, सधनांना अभय
पवारांचा पवित्रा : पालकमंत्र्यांच्या अतिक्रमण निर्मूलन आदेशाचा सोयीस्कर उपयोग
अमरावती : शहरात बुधवारी गाडगेनगर, इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, कॅम्प, वेलकम पॉर्इंट, पंचवटी, राजापेठ, मालटेकडी परिसरात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत केवळ अस्थायी अतिक्रमण जमीनदोस्त करून स्थायी अतिक्रमिताना महापालिका अधिकाऱ्यांचे अभय आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समन्यायी अतिक्रमण निर्मूलनाचे स्पष्ट आदेश दिले असताना महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक भेदभाव केल्याने नागरिकांमध्ये पालकमंत्र्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलनासारख्या संवेदनशील कारवाईत नव्या महापालिका आयुक्तांनी घेतलेला हा पावित्रा गंभीर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
गत आठवड्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन महानगरात वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कमालीची नाराजी व्यक्त केली होती. महिनाभरात अतिक्रमण काढण्यात आले नाही तर प्रशासन जबाबदार राहील, अशी तंबी पालकमंत्र्यांनी दिली होती. त्याअनुषंगाने अतिक्रमण निर्मूलनाचा पहिला टप्पा बुधवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आला.
सर्वांत मोठी कारवाई
अमरावती : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत फुटपाथ बळकावणारी प्रतिष्ठाने अतिक्रमण निर्मूलन पथकाने लक्ष्य केली. या कारवाईत महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासन सहभागी होते.
वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय, दंगा नियंत्रण पथक व विविध ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी असे मिळून १२५ ते १३० जणांचा ताफा अतिक्रमण हटविण्यासाठी रस्त्यावर असल्याचे चित्र शहरवासीयांनी अनुभवले. भलामोठा पोलीसताफा, महापालिका निर्मूलन पथकाचे कर्मचारी अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी घेऊन आल्याने अतिक्रमण धारक धास्तावले होते. फुटपाथवरील अतिक्रमण लक्ष करताना काही दुकानदारांना समज देण्यात आली. खाद्यपदार्थ, भाजीपाला विक्रेते, पानठेले, खोके, फलके आणि फुटपाथवरील व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले. या कारवाईत ७ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गाडगेनगरात अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध करण्यात आला. मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने व्यवसायिकांचा विरोध क्षणातच संपला. या कारवाईने अतिक्रमणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी फुटपाथ मोकळे झाल्याने नागरिकांनी या कारवाईचे समर्थन केले आहे.
या कारवाईत पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम, सहायक पोलीस आयुक्त पी. डी डोंगरदिवे, गाडगेनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक के. एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक अजय मालवीय, पोलीस निरीक्षक दिगंबर नागे, गाडगेनगरचे ठाणेदार अर्जून ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई आदी सहभागी झाले होते.
बुधवारची कारवाई या वर्षातील सर्वात मोठी मोहिम गणली गेली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई निरतंरपणे सुरु राहणार असून स्वंयस्फुर्तीने अतिक्रमण काढण्याच्या सूचना नागरिकांना प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)
‘ध’चा ‘मा’...
इतिहासात ‘ध’चा ‘मा’ केल्याचे उदाहरण आजही जिवंत आहे. ‘धरावे’ असा आदेश पुण्यातील राज्यकर्त्यांनी काढल्यावर त्याचा अंमल करणाऱ्या प्रमुख व्यक्तीने तो आदेश अक्षरबद्ध करताना ‘ध’ऐवजी ‘मा’ हे अक्षर वापरले. त्यामुळे ‘धरावे’ऐवजी ‘मारावे’ असा हुकूम सुटला. आदेशाची अंमलबजावणी झाली. अटकेऐवजी माधवराव मारले गेले. पालकमंत्र्यांच्या आदेशाचे बुधवारी असेच काहिसे झाले. ‘शहर अतिक्रमणमुक्त करा’ हे त्यांनी दिलेले आदेश ‘शहर अस्थायी अतिक्रमणमुक्त करा’ अशा पद्धतीने अमलात आणले गेले.
यानंतरही कारवाई सुरूच राहणार आहे. वाढलेले अतिक्रमण काढणे गरजेचे झाले आहे. शहर अतिक्रमणमुक्त करावयाचे आहे.
- हेमंत पवार,
आयुक्त महापालिका
अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. म्हणूनच संयुक्त कारवाई केली. गुरुवारला ईदचा बंदोबस्त राहणार आहे. त्यानंतर पुन्हा कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त अमरावती.