विद्यापीठाच्या १५४.९० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर
By Admin | Updated: March 31, 2017 00:15 IST2017-03-31T00:15:49+5:302017-03-31T00:15:49+5:30
जुन्या, नवीन कायद्याची सांगड घालीत अमरावती विद्यापीठाने सन २०१७-२०१८ या वर्षातील १५४.९० कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला.

विद्यापीठाच्या १५४.९० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर
विद्यार्थीभिमुख योजनांना प्राधान्य : ५४.६९ कोटींंची तूट अपेक्षित
अमरावती : जुन्या, नवीन कायद्याची सांगड घालीत अमरावती विद्यापीठाने सन २०१७-२०१८ या वर्षातील १५४.९० कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला. कुलगुरू चांदेकर यांच्या संकल्पनेतील विद्यार्थीभिमुख योजनांना बजेटमध्ये स्थान मिळाले आहे. अंदाजित प्राप्ती आणि खर्चाचा ताळमेळ बसवून ५४.६९ कोटी तुटीच्या बजेटवर मोहोर उमटवली.
अध्यक्षस्थानी कुलगुरू चांदेकर होते तर कुलसचिव अजय देशमुख यांनी कामकाजात सहभाग घेतला. लेखा व वित्त अधिकारी तथा व्यवस्थापन परिषद सदस्य शशीकांत अस्वले यांनी सन २०१६-१७ चा सुधारित तर सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी व्यवस्थापन परिषद सदस्य एफ.सी. रघुवंशी यांनी अनुपालन अहवालावर बोट ठेवले. साहित्य खरेदी करून ते वापरात येत नसेल तर कशाला खरेदी करता, असा सवाल रघुवंशी यांनी केला. जलतरण तलावाच्या देखभालीवर उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल तर ते खासगी तत्त्वावर का दिले जात नाही, असेही ते म्हणाले. "अॅफिलेशन" महाविद्यांलयांकडे थकीत शुल्क, कॅन्टीनचे लीजधोरण, टेली सॉफ्टवेअर खरेदीचा मुद्दा उपस्थित करून रघुवंशी यांनी सभेचे लक्ष वेधले. यावेळी कुलगुरूंनी रघुवंशी यांच्या सूचनांचे पालन करून बजेटमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. वाशीम येथे विद्यापीठ उपकेंद्र निर्मितीबाबत चर्चा झाली. विद्यापीठात चार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मंथन झाले. वार्षिक अहवालाचे वाचन मराठी विभागप्रमुख मनोज तायडे यांनी केले. यावेळी जयंत वडते, अविनाश असनारे, चौबे, श्रीकांत पाटील, अजय देशमुख आदींनी काही निधीच्या तरतुदीविषयी मत मांडले. परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प, योजना किंवा सहयोय कार्यक्रम अनुदान या तीन भागांमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये
स्वच्छ भारत- स्वस्थ भारत उपक्रम, बेस्ट प्रॅक्टीसेस इन युनिव्हर्सिटींतर्गत विविध कार्यक्रम, परीक्षा सुधारणा अंतर्गत जुन्या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ई-गव्हर्नन्स, विद्यार्थी सुरक्षा विमा, संशोधक तसेच विद्यार्थ्यांना अत्यावश्यक गं्रथालयीन सुविधा, बुलडाणा येथे आदर्श पदवी महाविद्यालय, संत गाडगेबाबा विद्याधन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, आपत्कालीन निधीतून विविध उपक्रम व शिबिर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा बस पास, संत गाडगेबाबा शिक्षण संरक्षण योजना, संत गाडगेबाबा शुद्ध पेयजल योजना, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अपारंपरिक ऊर्जा व जलस्त्रोत निर्मिती ही वैशिष्ट्ये होत.
विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तसेच परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या अनुषंगाने बजेटमध्ये योजना, उपक्रमांना स्थान देण्यात आले आहे. तुटीचा अर्थसंकल्प असला तरी येत्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून निधी, अनुदानाची मागणी करुन ही तूट भरून काढू. विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार कामकाज केले जाईल. - मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, अमरावती विद्यापीठ