रक्तपाताने हादरले बारगाव, ‘तो’ क्रूरकर्मा मात्र निर्विकार !
By Admin | Updated: January 24, 2015 22:45 IST2015-01-24T22:45:21+5:302015-01-24T22:45:21+5:30
दिवसभर काबाडकष्ट करून सूर्य मावळताच कष्टकरी निद्रिस्त होतात. पहाटे उठून पुन्हा कामाला लागतात. परंतु शुक्रवारची मध्यरात्र बारगाववासीयांसाठी थरारक ठरली. त्यांच्या शांत

रक्तपाताने हादरले बारगाव, ‘तो’ क्रूरकर्मा मात्र निर्विकार !
अनैतिक संबंधांची भयावह परिणती : गावात स्मशानशांतता, दहशत कायमच, घटनेनंतरही उघडली नाहीत बंद दारे
संजय खासबागे/अश्वपाल वानखेडे - वरूड / बारगाव
वरूड : दिवसभर काबाडकष्ट करून सूर्य मावळताच कष्टकरी निद्रिस्त होतात. पहाटे उठून पुन्हा कामाला लागतात. परंतु शुक्रवारची मध्यरात्र बारगाववासीयांसाठी थरारक ठरली. त्यांच्या शांत आणि सरळ रेषेतील दिनचर्येला या घटनेने छेद दिला. येथे घडलेला रक्तपात त्या गावकऱ्यांसाठी ‘न भूतो न भविष्यती’ असाच होता.
बारगाव येथील झोेपडपट्टीत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. आपण बरे अन् आपले काम बरे..अशी येथील प्रथा. शुक्रवारीसुध्दा येथील ग्रामस्थ थकून-भागून झोपी गेले. अर्धी रात्र उलटत नाही तोच गोंधळ उडाला. गावाच्या शांततेला छेद देणारी घटना घडली होती. अनैतिक संबंधाची क्रूर परिणती अवघा गाव पाहत होता. दोन निर्दोष चिमुकले झोपेतून जागे होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह पाहून नि:शब्द झाले होते. घडलेल्या घटनेचे सुसूत्रीकरण त्यांच्या बालबुध्दीला शक्य नव्हते. बारगाव येथील मनोजसिंग भादा आणि गावातीलच विवाहिता अंजिरा उईके यांच्यातील अनैतिक संबंधांची अशी भयंकर परिणती कोणालाच अपेक्षित नव्हती. परंतु नको ते घडले. त्यामुळे सगळे गावच भांबावून गेले आहे. प्रेयसीला तिच्या दिरासह नको त्या अवस्थेत पाहून आरोपी मनोजसिंगचा पारा चढला. दारावर लाथ मारून त्याने घरात प्रवेश केला आणि चाकूने सपासप वार करून संपवून टाकले. त्यानंतर तो थेट स्वत:च्या घरी गेला. अनैतिक संबंधाचा सातत्याने विरोध करणाऱ्या पित्यावरही त्याने गावठी कट्ट्याने गोळी झाडली. पिता जागीच गतप्राण झाला. एव्हाना गावकऱ्यांना घटनेची कल्पना आली. पण, कोणीही घराबाहेर पडले नाही. आरोपी मनोजसिंगच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूूमी हेच त्या मागचे कारण होते. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जीव मुठीत घेऊन गावकरी दुसऱ्या दिवशी हळूहळू बाहेर पडत होते आणि घटनेचा कानोसा घेत होते.