‘डफरीन’मध्ये सुरू होणार रक्तपेढी
By Admin | Updated: May 25, 2016 00:32 IST2016-05-25T00:32:23+5:302016-05-25T00:32:23+5:30
येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) मध्ये प्रसूत महिलांना दरदिवशी १५ ते २० रक्त पिशव्या लागत असल्यामुळे ....

‘डफरीन’मध्ये सुरू होणार रक्तपेढी
शासनाकडे प्रस्ताव : फॉलोअर खाटांचीदेखील मागणी
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) मध्ये प्रसूत महिलांना दरदिवशी १५ ते २० रक्त पिशव्या लागत असल्यामुळे येथे नव्याने रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तूर्तास इर्विनमधील रक्तपेढीतून रक्त मागविले जात आहे.
‘डफरीन’चे अधीक्षक संजय वारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात ‘डफरीन’ कायम आजार असल्याचे स्पष्ट केले आहे. मनुष्यबळाचा अभाव, सोयी-सुविधांची वानवा या महत्त्वपूर्ण बाबींमुळे उपचार करणे कठीण झाल्याचे विषद केले आहे. ‘डफरीन’ची रुग्णक्षमता ही २०० असताना येथे ३५० ते ४०० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामुळे आरोग्यसुविधा पुरविताना यंत्रणेची दमछाक होत आहे. रूग्णालयात साधन सामुग्रीचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यसेवा संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ‘डफरीन’मध्ये रुग्णसेवेचा ताण ही नित्याचीच बाब असताना मेळघाटसह ग्रामीण भागातील गंभीर स्वरुपाच्या महिला रूग्णांना प्रसूती, उपचाराकरिता भरती केले जाते. सध्या ‘डफरीन’ला रक्ताचा तुटवडा या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रसूत महिलांना वेळीच रक्ताचा पुरवठा करता न आल्याने जानेवारी ते एप्रिल २०१६ या चार महिन्याच्या कालावधीत तीन गर्भवती मातांना मृत्यूच्या दारी जावे लागले. साधन-सामुग्री, सोयी-सुविधांअभावी रुग्णांचा मूत्यू होणे, ही बाब अतिशय खेदजनक आहे.
रुग्णसेवा कोलमडण्याची भीती
अमरावती : रुग्णसेवेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी कैफियत जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक वारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. अलिकडे ‘डफरीन’मध्ये रक्तसंकलन केंद्र असले तरी रक्तासाठी इर्विनवर अवलंबून राहावे लागते. येथील एक रेडिओलॉजिस्ट, ३० परिचारीका आणि १४ अधिपरिचारीकांचे पद रिक्त असून ते शासनाने त्वरीत भरावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वॉर्डात रुग्णसेवेसाठी कंत्राटी पद्धतीने ३४ कक्षसेवक नेमण्यात आले आहे. मात्र, आरोग्य उपसंचालकांनी हे कक्षसेवक बंद करण्याचे फर्मान जारी केले आहे. येत्या काळात कक्षसेवक बंद केल्यास ‘डफरीन’ मधील रुग्णसेवा कोलमडेल, अशी भीती आहे. ‘डफरीन’मध्ये उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.