स्कूल व्हॅनसाठी शाळांजवळ नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 00:34 IST2016-12-22T00:34:49+5:302016-12-22T00:34:49+5:30
शाळकरी मुलांची प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्कुल व्हॅनची तपासणीकडे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी विशेष लक्ष वेधले आहे.

स्कूल व्हॅनसाठी शाळांजवळ नाकाबंदी
मुस्लीम भागात विशेष लक्ष : आयुक्तांनी मागविला आठ दिवसांत अहवाल
अमरावती : शाळकरी मुलांची प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्कुल व्हॅनची तपासणीकडे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी विशेष लक्ष वेधले आहे. शाळांजवळील परिसरात नाकाबंदी लावण्यात येणार असून मुलांना शाळेत सोडल्यानंतर बाहेर निघणाऱ्या स्कुल व्हॅनची नाकाबंदीदरम्यान तपासणी केली जाणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांना आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
शहरात अधिकृत व अनधिकृतपणे स्कुल व्हॅन चालत असल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनास आले आहे. स्कुल व्हॅनची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही आरटीओ कार्यालयाची आहे. मात्र, अनधिकृपणे स्कुल व्हॅन चालवून शाळकरी मुलांच्या जीवितास हानी होऊ नये, या दृष्टीने पोलीस विभागानेही ही तपासणी मोहिम हाती घेतली आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षेविषयी आता पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. वाहतूकीदरम्यान व्हॅनमध्ये विद्यार्थी बसले असतात, अशावेळी व्हॅनची तपासणी करणे किंवा कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर ती व्हॅन बाहेर निघताच नाकाबंदीदरम्यान तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त मडंलिक यांनी वाहतूक शाखेला सूचना दिल्या असून आठ दिवसात अहवाल मागितला आहे. (प्रतिनिधी)
त्या स्कूल व्हॅनची नोंदणीच रद्द
नागपुरी गेट व खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम परिसरात सर्वाधिक अनधिकृत स्कुल व्हॅन चालतात. काही दिवसांपूर्वी भर रस्त्यावर एमएच २७ बीएफ-१९८ या क्रमाकांच्या स्कुल व्हॅनमध्ये भडका उडाला होता. सुदैवाने त्यात विद्यार्थी नव्हते. पोलीस चौकशीत ती स्कुल व्हॅन अनधिकृतपणे चालविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच ती स्कुल व्हॅन नसून स्कुल व्हॅनप्रमाणे शाळेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरटीओमार्फत त्या व्हॅनची नोंदणी रद्द सुध्दा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुस्लिम परिसरातील स्कुल व्हॅनच्या तपासणीकडे पोलीस विशेष लक्ष देणार आहे.
जिल्हा स्कूल बस समितीची बैठक
स्कुल बस व व्हॅनवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्कुल बस समिती कार्यरत आहे. समितीचे अध्यक्ष पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी नुकतीच आयुक्तालयात समितीची बैठक बोलाविली होती. त्यामध्ये माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, एसटी महामंडळााो नियंत्रक, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबधीत उपाययोजनेवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. स्कुल बसमध्ये सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य आहेत. मुलींच्या व्हॅन किंवा बसमध्ये महिला वाहक असणे गरजेचे आहे. अशाप्रकारच्या आदी मुद्यावर चर्चा करून ही सामुहीक जबाबदारी आपआपल्या परिने पार पाडावी, अशा सूचना अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या.