बूब-भारतीय यांच्यात धक्काबुक्की

By Admin | Updated: February 21, 2015 00:25 IST2015-02-21T00:25:39+5:302015-02-21T00:25:39+5:30

अमरावती : भाजप गटातून स्थायी समितीमध्ये सदस्यपदी दिनेश बूब यांची नियुक्ती

Blasting between Boob-Bharatiya | बूब-भारतीय यांच्यात धक्काबुक्की

बूब-भारतीय यांच्यात धक्काबुक्की

अमरावती : भाजप गटातून स्थायी समितीमध्ये सदस्यपदी दिनेश बूब यांची नियुक्ती न झाल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद आज सभ्यतेच्या तमाम सीमा पार करून गेला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीत महापालिकेची त्यामुळे बेअब्रु झाली.
सदस्यपदप्राप्तीवरून शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष दिनेश बूब आणि भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्यात तुफान शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच या वादाने उग्र वळण घेतले आणि महापालिकेला अक्षरश: आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. बूब व भारतीय यांनी एकमेकांची कॉलर पकडली. बुब यांचे समर्थक आक्रमकरित्या भारतीय यांच्यावर चालून गेले. महापालिकेत कुठलेही पद नसलेले हे समर्थक ऐनवेळी तेथे आले कसे? भारतीय यांच्यावर हात उगारण्याची त्यांच्यात हिंमत आली कुठून? हे प्रश्न अनेक शंकांना जन्म देतात.
महापालिकेत भाजपची नऊ सदस्यसंख्या आहे. यात दोन अपक्ष असून त्यात दिनेश बूब, अंबादास जावरेंचा समावेश आहे. या संख्याबळावर भाजपला अजय सामदेकर यांच्या रूपाने एक स्वीकृत सदस्य सभागृहात पाठविता आला. स्थायी समितीत एक सदस्य पाठविणेदेखील सुकर झाले. दोन्ही अपक्षांनी भाजपला पाठिंबा देतानाच स्थायी समितीत नियुक्ती करण्याचा लेखी करार झाला होता. दिनेश बूब, अंबादास जावरे यांनी सभागृहात ही माहिती दिली. सध्या भाजप गटातून छाया अंबाडकर यांना स्थायी समितीत सदस्यत्व देण्यात आले आहे. नैसर्गिक प्रक्रियेनुसार अंबादास जावरे स्थायी समितीतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे जावरे यांच्या जागी अपक्ष सदस्य बूब यांची स्थायी समितीत नियुक्ती व्हावी, अशी मागणी सभागृहात जावरे आणि बूब यांनी केली.

पोलिसांसोबतही वाद
४दिनेश बूब आणि तुषार भारतीय समर्थक आमने-सामने आले असता पोलिसांनी दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोतवालीचे निरीक्षक इंगळे यांच्यासोबतही काही समर्थकांचा वाद झाला. यावेळी पोलिसांसोबत धक्काबुक्की सुध्दा झाली. पोलिसांनी दिनेश बूब समर्थक महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढताना सावधगिरी बाळगली.
महापालिकेत भाजपचे सात सदस्य असून दोन अपक्षांच्या सहकार्याने हा मोठा गट म्हणून अस्तित्वात आला. दोन्ही अपक्षांचे समर्थन घेताना भाजपने त्यांना स्थायी समितीत स्थान देण्याचा लेखी करार केला आहे. तरीही शुक्रवारी भाजपने भारतीय यांना स्थायी समितीत पाठविले. संजय अग्रवाल यांनी शब्द फिरविला.
-दिनेश बूब, अपक्ष नगरसेवक.
अपक्षांसोबत कोणताही करार झाला नाही. उपमहापौरांच्या निवडणुकीत भाजपच्या छाया अंबाडकर यांना मतदान करण्याऐवजी अपक्ष सदस्य तटस्थ राहिलेत. आज प्रतिभा बोपशेट्टीवार या महिलेने हात उगारला. पोलिसांनी तिला रोखले. दिनेश बूब कोणत्या स्तरावर राजकारण करतात, हे दिसून आले.
-तुषार भारतीय, शहराध्यक्ष, भाजप.
भाजपला समर्थन देताना काही लेखी करार झाले आहेत. माजी शहराध्यक्ष प्रदीप शिंगोरे यांच्यासोबत झालेल्या करारानुसार अपक्षांना स्थायी समितीत पाठविण्याचे ठरले होते. परंतु अपक्षांना डावलून भारतीय यांना पाठविण्यात आले. ही अन्यायकारक बाब आहे. या बाबीला गटातील चार सदस्यांचा विरोध आहे.
-अंबादास जावरे, अपक्ष नगरसेवक, महापालिका.

Web Title: Blasting between Boob-Bharatiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.