लघु पाटबंधारे विभागाचा गावतलाव फोडला
By Admin | Updated: July 6, 2015 00:10 IST2015-07-06T00:10:43+5:302015-07-06T00:10:43+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) ...

लघु पाटबंधारे विभागाचा गावतलाव फोडला
पाणीसाठ्यात घट : ७५ हजारांचे नुकसान, पोलिसांत तक्रार
चांदूरबाजार : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी व पाण्याची पातळी वाढावी म्हणून पाटबंधारे विभागाने वणी (बेलखेडा) येथील २० वर्षांपूर्वी बांधलेला तलाव काही शेतकऱ्यांनी फोडला. त्यामुळे तलावातील बराचसा पाणीसाठा रिकामा झाला असून नाल्यात पाणी व्यर्थ वाहत आहे.
या घटनेची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने घेऊन याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरुध्द पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे गाव तलावाची निर्मिती करून २० वर्षांपूर्वीच्या तलावाला जेसीबीद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. सन १९९३-९४ मध्ये वणी (बेलखेडा) शिवारात तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सात शेतकऱ्यांच्या ५ हेक्टर ५६ आर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. अ. रहीम शे. मुनीर या शेतकऱ्यांनी सदर तलाव जेसीबीने तोडल्याची बाब गावकऱ्यांच्या चर्चेतून उघड झाली. अ. रहीम यांचे मालकीची ३६ आर जमीनदेखील या तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्यानंतर हा तलाव २०१० मध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.
सदर तलाव १ जुलै रोजी रात्री तोडल्याचे उघड होताच पं.स. सदस्य मंगेश देशमुख यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावडे व वणीचे तलाठी यांना दिली. त्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शशीकांत कुळकर्णी यांना दिल्यावरुन त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन या घटनेची तक्रार चांदूरबाजार पोलिसात केली. यात त्यांचे ७५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. तक्रारी नुसार सदर तलावाचे बांधकाम अ. रहीम शे. मुनीर व इतर लोकांनी फोडल्याची कबुली अ. रहीम यांनी दिल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. ठाणेदार डी.बी. तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणात कलम ४३० भादंविच्या व प्रॉपर्टी डेमेज अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)