आणि उघडलेच नाही ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान!

By Admin | Updated: June 29, 2016 00:11 IST2016-06-29T00:11:38+5:302016-06-29T00:11:38+5:30

नेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे.

Bitibai's grocery store never opened! | आणि उघडलेच नाही ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान!

आणि उघडलेच नाही ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान!

सामूहिक आत्मघात : अंजनगावात फक्त नि:शब्द उसासे, हादरली अवघी मानवता
संदीप मानकर/चेतन घोगरे अंजनगाव सुर्जी
नेहमी या ना त्या कारणांनी चर्चेत असलेली ही नगरी. जरा खुट्ट झाले की पेटलीच दंगल. झालीच हाणामारी. संवेदनशील शहर म्हणून अंजनगावची पोलीस दप्तरी नोंद आहे. पण, मंगळवारी जे घडले ते प्रत्येक संवेदनशील मनाला हादरविणारे होते. एकाच कुटुंबातील दोन पुरूषांसह चार महिलांनी एकाच वेळी अत्याधिक जहाल विषारी औषध प्राशून जीवनयात्रा संपविली. सोमवारी रात्री निजलेले हे कुटुंब मंगळवारी दुपारपर्यंत उठलेच नाही आणि मग उघडकीस आलेले वास्तव हादरवणारे होते. ज्याने-ज्याने पाहिले, ऐकले तो नि:शब्द झाला.
अंजनगाव शहरात प्रसिद्ध असलेले ‘बिट्टीबाईचे’ किराणा दुकान. चव्हाण कुटुंबाचे हे दुकान म्हणजेच त्यांचे सर्वस्व. घरातील प्रत्येक कुटुंब या दुकानासाठी झटत असे. नियमित दुकान उघडायचे. रोखीने माल आणायचा आणि रोखीनेच विकायचा, असा या कुटुंबाचा शिरस्ता. प्रफुल्ल नारायणसा चव्हाण (४८), विवेक नारायणसा चव्हाण (४०),

परिसरात पेटल्या नाही चुली
अंजनगाव सुर्जी : लक्ष्मी नारायणसा चव्हाण (५०), मंगला नारायणसा चव्हाण (५२) आणि कामिनी अरूणसा बारड (२९), रोशनी अरूणसा बारड (२६) हे या कुटुंबातील सदस्य. सगळेच अविवाहित काही कारणास्तव यांची लग्ने झालीच नाहीत.
यापैकी कामिनी ही दररोज सकाळी उठून दुकान उघडायची. दुकानाची झाडपूसही तीच करायची. कामिनी आणि रोशनीची आई उषाबाई बारड यांचे घर त्याच भागात थोड्या अंतरावर आहे. तेथे त्या मुलगा रोशनसह राहतात. परंतु कामिनी आणि रोशनी या आपल्या आत्या-मामांसोबत त्यांच्याच घरी राहायच्या. कामिनी आणि रोशनीचे शिक्षण अवघे दहाव्या इयत्तेपर्यंत झाले होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले. कामिनी आणि रोशनीचे वडील अरूणसा यांचे आठ-दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मंगळवारी काठीपुरा परिसराला नेहमीप्रमाणे जाग आली. दिनचर्याही नेहमीप्रमाणेच सुरू झाली. पण, ‘बिट्टीबाई’चे किराणा दुकान काही उघडले नाही. दोन लहान मुली सवयीप्रमाणे दुकानात आल्या. पण, दुकान बंद. त्या परत गेल्यात. दुपारचे दीड वाजले तरी दुकानासह चव्हाण कुटुंबाच्या घरात वर्दळ नव्हती. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. याच भागात चव्हाण कुटुंबाची ८ ते १० घरे आहेत. शेजारीच किशोर चव्हाण राहतात. लोकांनी त्यांच्याकडे शंका व्यक्त केली. त्यांनी नजीकच सावकारपुऱ्यात राहणाऱ्या उषा बारड यांचा मुलगा रोशनला सांगितले. रोशन मामाच्या घरी पोहोचला. त्यानेही बराच वेळ दार ठोठावले. पण, आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस लोकांनी त्याला घरावर चढवून घरात प्रवेश करावयास सांगितले. तो आत गेला आणि आतील दृश्य पाहताच त्याची पाचावर धारण बसली. शेजारी-शेजारी पडलेले आपल्या आत्या-मामांसह सख्ख्या बहिणीचे मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. नागरिकांनाही एव्हाना या भयंकर घटनेची माहिती मिळाली होती. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. अगदी शांतताप्रिय असलेल्या या कुटुंबाने केलेल्या या आत्मघातकी प्रकारामुळे प्रत्येक जण हादरला होता. डोळ्यातील अश्रूही आटले होते. नेमके काय घडले? हेच अनेकांना उमगत नव्हते. असे का व्हावे? हाच सवाल प्रत्येक जण एकमेकांना फक्त डोळ्यांनीच विचारत होता. पोलिसांनी या घटनेच्या कारणमीमांसेकरिता मृत कामिनी आणि रोशनीची आई उषा बारड यांना पोलीस ठाण्यात नेले. मृतांच्या काकू प्रमिला चव्हाण म्हणाल्या ही घटनाच अविश्वसनीय आहे. तर गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटूंबाचा हा अंत हादरविणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेमुळे स्तब्ध झालेल्या काठीपुऱ्यासह आसपासच्या भागात मंगळवारी चुली पेटल्या नाहीत. जिल्हाधिकारी किरण गित्ते, माजी आमदार अरुण अडसड यांनी या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेतली.

दोन बहिणींचा आधीच झालाय मृत्यू

चव्हाण कुटुंबातील नारायणसा चव्हाण यांना तीन मुले आणि सहा मुली. त्यापैकी या घटनेत लक्ष्मी आणि मंगला यांचे निधन झाले. एक बहीण मोर्शीला, एक अंजनगावला तर दोन अंजनगावात राहते. एक मुलगादेखील अमरावतीलाच वास्तव्यास आहे.

चार डॉक्टरांनी केले शवविच्छेदन
दुपारी ३ वाजता सहा मृतदेह अंजनगावच्या रूग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले. तेथे भर पावसात कमांडोंच्या निगराणीखाली सायंकाळी ५.३० वाजता शवविच्छेदनाला सुरूवात झाली. अंजनगावचे वैद्यकीय अधीक्षक नरेंद्र सोळंके, चंद्रशेखर पाटील, अमरावती, पूनम मोरे, दर्यापूर, सुशील देशमुख, दर्यापूर या चार डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. ही प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती.

कृषी केंद्रानजीक प्रफुल्ल दिसल्याची चर्चा
सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास मृत प्रफुल्ल नारायणसा चव्हाण हा बसस्थानकानजीकच्या एका कीटकनाशक औषधीच्या दुकानाजवळ फिरताना आढळल्याची चर्चा दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती.

Web Title: Bitibai's grocery store never opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.