भररस्त्यावर तलवारीने कापला 'बर्थ डे' केक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:16 IST2019-01-28T23:16:17+5:302019-01-28T23:16:40+5:30
काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा), आकाश यशवंत धिमारे (१९) व करण सुरेश थोरात (२१, दोन्ही रा. पंचशीलनगर) अशी आरोपींची नावे असून, या पाचही जणांना पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली.

भररस्त्यावर तलवारीने कापला 'बर्थ डे' केक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा), आकाश यशवंत धिमारे (१९) व करण सुरेश थोरात (२१, दोन्ही रा. पंचशीलनगर) अशी आरोपींची नावे असून, या पाचही जणांना पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली.
काँग्रेसनगर मार्गावर काही तरूण रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करून विक्की मोरेचा वाढदिवस साजरा करीत होते. विशेष म्हणजे, त्या तरूणाच्या हातात तलवार होती.
त्या तलवारीने ते केक कापत असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेत्तृत्वात एएसआय प्रवीण घोळवे, पोलीस शिपाई विनोद चिखलकर, सतीश गाढवे, विजू राऊत, अनूप झगडे व वाहनचालक जवंजाळ यांच्यासह चोरपगार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून पाचही तरुणांनी आपआपल्या मोटरसायकल घेऊन पलायन केले. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र, ते हाती लागले नाही.
पोलिसांनी त्या तरुणांच्या दुचाकी क्रमांकांवरून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर पाचही जणांना मध्यरात्रीतून विविध परिसरातून अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४/२५ आर्मअॅक्टसह कलम १४३, १४७, १४८ व १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पाचही जणांना अटक केली. या पाचही तरूणांना रात्री पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
काँग्रेसनगर मार्गावर काही तरुण तलवारीने केक कापत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस गेले असता, त्या तरुणांनी पळ काढला. दुचाकी क्रमांकावरून त्या तरुणांचा शोध घेतला. मध्यरात्री त्यांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, फ्रेजरपुरा