जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य
By Admin | Updated: March 15, 2015 00:35 IST2015-03-15T00:35:47+5:302015-03-15T00:35:47+5:30
जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर...

जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य
चांदूरबाजार : जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संपूर्ण मानव जातीचे भविष्य धोक्यात आले आहे. मानव जातीने पृथ्वीतलावर ताबा केला आहे. भूतलावरील वाढलेली प्राणीमात्रा, वनसंपदा यांचे संवर्धन व संगोपन वेळीच केले नाही तर भविष्यात मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचा इशारा प्र्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूरचे सचिव दिलीपसिंह यांनी केले.
स्थानिक आनंद सभागृहात पंचायत समितीतर्फे आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, दिलीप गुजर, वनराई संस्थेचे अध्यक्ष मधुकर घारड, प्राचार्य विजय टोम्पे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून पं.स.चे उपसभापती राजेश सोलव व गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे उपस्थित होते.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा होत असल्याचे सांगून मानवी जीवनही धोक्यात आल्याचे सांगितले. दिलीप गुर्जर आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की वर्ष २००३ मध्ये जैविक विविधता कायदा अमलात आणण्याची गरज पडली. दैनंदिन जीवनातील उपयोगी पडणाऱ्या तुळस, हळद, बासमती तांदुळ, सागरगोटी आदी संपदा वाचविण्यासाठी हा कायदा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम टेकाडे यांनी व संचालन गजानन राऊत यांनी केले.
या कार्यशाळेला ग्रा.पं.चे सचिव व सरपंच, पं.स कर्मचारी आदींची उपस्थितीती होती. आभार विस्तार अधिकारी मीना म्हसतकर यांनी मानले.