वऱ्हा येथील घटना : कुऱ्हा ठाण्यात तक्रारअमरावती : पुरोगामी महाराष्ट्रात पैशांच्या वादातून एका इसमाला निर्वस्त्र करून गावात धिंड काढण्यात आली. हा धक्कादायक प्रकार तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावात आठ दिवसांपूर्वी घडला. मात्र, ज्याच्यावर हा अन्याय झाला, त्याच्याच विरोधात महिलेने विनयभंग केल्याची तक्रार कुऱ्हा पोलिसांना दिली. मारहाण व धिंड काढण्याचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाल्यामुळे हा प्रकार चर्चेत आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून तो युवक महिलेच्या घरात नसून जवळील एका वेल्डींगच्या दुकानसमोर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. धिंड काढण्यात आलेल्या श्रीधर घाटोळ यांच्या माहितीनुसार १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या पतीसह काही साथीदारांना घेऊन गावाबाहेरील वेल्डींगच्या दुकानसमोर आले. त्यावेळी तेथे बसलेल्या श्रीधर घाटोळ यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला चढविण्यात आला. या वादात मध्यस्थी करणाऱ्याना सुध्दा मारहाण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात येते. मारहाण करणारे इतक्यावरच न थांबता त्यांनी त्या इसमाला निर्वस्त्र करून जवळपास दोन किलोमिटरपर्यंत मारहाण करीत नेले. यामध्ये तो इसम गंभीर जखमी झाला आहे. त्याला इर्वीनमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रीधर घाटोळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द तर महिलेच्या तक्रारीवरून श्रीधर घाटोळविरूध्द गुन्हा नोंदविला.वैयक्तीक कारणास्तव हा वाद उफाळून आला होता. त्यामध्ये दोन्ही पक्षातर्फे तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.माधव गरूड, प्रभारी पोलीस निरीक्षक, कुऱ्हा पोलीस ठाणे.
इसमाची निर्वस्त्र करून काढली धिंड
By admin | Updated: July 20, 2016 23:55 IST