परतवाड्यात कोट्यवधींचे सागवान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:53+5:302021-02-05T05:22:53+5:30

पान २ चे लिड फोटो पी ०१ अनिल कडू फोल्डर परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा येथील कोट्यवधी रुपयांचे ...

Billions of teak openings in the backyard | परतवाड्यात कोट्यवधींचे सागवान उघड्यावर

परतवाड्यात कोट्यवधींचे सागवान उघड्यावर

पान २ चे लिड

फोटो पी ०१ अनिल कडू फोल्डर

परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा येथील कोट्यवधी रुपयांचे सागवान उघड्यावर असून, या लाकडांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मेळघाटातील जंगलातून काढून आणलेले हे मौल्यवान लाकूड परतवाडा डेपोअंतर्गत बाभूळबन, निमबन, नझूल, खापरखुंडी आणि सर्किट हाउस प्लॉटवर ठेवले जाते. ज्या ठिकाणी हे लाकूड आहे, त्या परिसराला मजबूत असे सुरक्षित आवार नाही, कुंपण किंवा आवार भिंत नाही.

उघड्यावर असलेल्या लाकडाची साल ओरबडून नेली जात आहे. लाकडावरील साल काढल्या गेल्यामुळे लाकूड तडकत आहे. लाकडाची गुणवत्ता व दर्जा घसरत आहे. जंगलातून लाकडाच्या तुकड्यांच्या दोन्ही तोंडावर शेण, माती आणि हिरमुंजी अथवा गेरूचा लेप लावणे अनिवार्य आहे. मात्र, त्या लेपाऐवजी केवळ लालसर रंग त्या ठिकाणी फासला जात आहे. लेप लावला जात नसल्यामुळे ते लाकूड खराब होत आहे. लेप आणि सालीच्या अभावामुळे त्या लाकडाच्या ग्रेडवर परिणाम होत आहे. त्याकडे वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष चालविले आहे.

चौकीदारही नाहीत

उघड्यावर पडून असलेल्या या लाकडांवर लक्ष ठेवायला वनविभागाकडे चौकीदार नाहीत. चार-दोन जे चौकीदार आहेत, त्यांचेवर लक्ष ठेवायला वनाधिकाऱ्यांना वेळ नाही. या चौकीदारांच्या शिट्ट्यांचे आणि लोखंडी ढोलाचे आवाज डेपोत कुठेही ऐकायला येत नाहीत. वाजवायला शिट्ट्या नाहीत. ढोल वाजवायला ठोका उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

प्रकाश व्यवस्था अपुरी

या लाकडाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने डेपो परिसरात असलेली प्रकाश व्यवस्था अपुरी ठरत आहे. या लाकडांचे आगीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने डेपो परिसरात पाण्याची परिणामकारक व्यवस्था नाही. ज्वलनशील पदार्थास मनाईचे फलक डेपो परिसरात नाही. चौकीदारांना गणवेश नाहीत. वनपाल वनरक्षकांना गणवेश असूनही ते वापरत नाहीत. डेपोत आग लागल्यास ती विझविण्याकरिता दोन ब्लोअर मशीन असल्याचे सांगितले जात आहे. या ब्लोअर मशीनने अजूनपर्यंत आग विझवली नसली, तरी त्या मशीनला लागणाऱ्या पेट्रोलचे व्हाउचर मात्र नियमितपणे जात आहेत.

परिसरात जुगार!

पुरेशा सुरक्षेअभावी येथील लाकूड चोरीला जाण्याची शक्यता बळावली आहे, तर डेपो परिसरातील स्वच्छता-देखभाल दुरुस्तीही दुर्लक्षित ठरली आहे. त्या परिसरात उघड्यावर जुगार खेळला जातो. गांजा आणि दारू पिणाऱ्यांची वर्दळ राहत आहे. अशातच जुगाराच्या खेळातील वादातून याच लाकूड डेपो परिसरात वर्षभरापूर्वी घडलेली हत्या आजही ताजी आहे. लाकूड डेपो परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे.

Web Title: Billions of teak openings in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.