‘खावटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:53+5:302021-09-08T04:17:53+5:30
कॉमन/ गणेश वासनिक फोटो : ०७, एएमपीएच ०१ (कॅप्शन: अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात निकृष्ट खावटी किराणा किट आणून ...

‘खावटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा
कॉमन/ गणेश वासनिक
फोटो : ०७, एएमपीएच ०१ (कॅप्शन: अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात निकृष्ट खावटी किराणा किट आणून टाकताना आदिवासी बांधव)
अमरावती : खावटी म्हणून आदिवासी बांधवांना वाटप केले जाणारी किराणा किट अत्यंत निकृष्ट आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी दुसरा लाॅकडाऊन घोषित करताना जी अतिरिक्त दोन हजारांची खावटी जाहीर केली, ती रक्कम अद्यापही मिळाली नाही. आदिवासी कुटुंबीयांना वाटप होणाऱ्या खावटी किटच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
लाॅकडाऊनमुळे आदिवासींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने खावटी योजना पुनर्जीवित केली. यात ११ लाख ५५ हजार कुटुंबांना रोख स्वरूपात २ हजार रुपये व वस्तू स्वरूपात २ हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासाठी सरकारने ४८६ कोटी रुपये मंजूर केले. मात्र, आता या योजनेत गरिबांना निकृष्ट धान्याचे वाटप केले जात आहे. अर्ज भरून नेले पण यादीत नाव आले नाही, यादीत नाव आले तर खात्यात पैसे जमाच झाले नाही, अशी ओरड आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दाट संशय असून आदिवासी समाजाला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ट्रायबल फोरमचे संस्थापक
अध्यक्ष प्रमोद घोडाम यांनी तक्रार केली आहे.
बाॅक्स
तूर डाळीत खडे, तर तेलाला कुबट वास
खावटी म्हणून मटकी १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वाटाणा १ किलो, तूर डाळ २ किलो, उडीद दाळ १ किलो, मीठ ३ किलो, गरम मसाला ५०० ग्रॅम, शेंगदाणा तेल १ किलो, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रॅम, साखर ३ किलो अशा १२ वस्तू वाटप केल्या जात आहेत. यातील चटणीत विटकरी रंगाचे बारीक खडे आहेत. तर मूग डाळ व तुरीच्या डाळीला वास येत आहे. या सर्व वस्तूंची बाजारातील किंंमत एक हजारांच्या घरात आहे. मात्र, ही किराणा किट हजारांच्या म्हणून आदिवासींच्या माथी मारत आहे.
-------------
कोट
खावटीतील वस्तू आयएसआय मार्क असायला पाहिजे; पण तसे नाही. जनावरे सुद्धा खाणार नाही असे निकृष्ट धान्य वाटप करून आदिवासी समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. या धान्याची तपासणी करून कोट्यवधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
-डॉ. संदीप धुर्वे, आमदार, आर्णी-केळापूर