बिल्दोरी पुलाची समस्या निकाली

By Admin | Updated: July 24, 2016 00:03 IST2016-07-24T00:03:30+5:302016-07-24T00:03:30+5:30

तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे.

Bildori bridge problem problem | बिल्दोरी पुलाची समस्या निकाली

बिल्दोरी पुलाची समस्या निकाली

वाहतुकीसाठी खुला : एकाच परिवारातील चौघांचा घेतला होता बळी
अमरावती : तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे. या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या नाल्यावर पूल नसल्याने ४ आॅगस्ट २०१५ रोजी नाल्याच्या पुरात यवतमाळ येथील आजनकर परिवारातील ४ जणांचा बळी गेला. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर व आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागली आहे.
गतवर्षी ५ व ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यासह तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती व उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला होता. त्यात हा अपघात घडला होता.

युद्धस्तरावर कामाचे आदेश
अमरावती : असलेला बिल्दोरी नाल्याचे पाणी थोपविल्यामुळे कौंडण्यपूर ते अंजनसिंगी हा मार्ग बंद होता. ६ आॅगस्ट रोजी वळणावर व खोलगट भागात असलेल्या या नाल्यावरील पुलावर किती पाणी आहे याचा अंदाज न आल्यामुळे यवतमाळ येथून आर्वी येथे लग्नाला निघालेल्या आजनकर परिवारातील ४ सदस्य असलेली कार ६ आॅगस्टला पुरात फसली व यामध्ये सर्वांचा दुर्दैवी अंत झाला होता.
‘हे तर प्रशासनाचेच नरबळी’ या अर्थाने ‘लोकमत’ने ही समस्या लावून धरली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ही जीवघेणी समस्या गांभीर्याने घेऊन या पुलासाठी निधी तत्काळ उपलब्ध करण्याचे आदेश सिंचन महामंडळाला व त्वरीत निविदा काढण्याचे आदेश विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिले होते. या कामाचा कार्यारंभ २९ आॅक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला व आठ महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण करण्यात आले. मुख्य अभियंता सी. व्ही. लुंगे यांनी सातत्याने या कामाचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, उपअभियंता दिनकर माहुरे यांच्या मार्गदर्शनात ५ कोटी १४ लाख रुपयांच्या या भव्य पुलाचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले व हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
युद्धस्तरावर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
एकाच परिवारातील चार निष्पापांचा बळी घेणाऱ्या या बिल्दोरी पुलाचे काम युद्धस्तर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. यशोमती ठाकूर यांनीदेखील ही समस्या मार्गी लागावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ९ महिन्यांच्या कालावधीत ही समस्या मार्गी लागली आहे.

चार व्यक्तींचा करूण अंत होणे ही दुर्दैवी घटना होती. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले. प्रशासनाच्या सर्व विभागाच्या मदतीने काम पूर्ण झाले याचा आनंद आहे.
- ज्ञानेश्वर राजूरकर,
माजी विभागीय आयुक्त.

Web Title: Bildori bridge problem problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.