बिगबजेट ‘शासन आपल्या दारी’ स्थगित; लवकरच नवीन तारीख, प्रशासनाची माहिती
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 21, 2023 20:19 IST2023-11-21T20:18:59+5:302023-11-21T20:19:13+5:30
विभागाच्या मुख्यालयी असलेला ‘शासन आपल्या दारी’ अभियानासाठी किमान पाच कोटींचा खर्च अपेक्षित होता.

बिगबजेट ‘शासन आपल्या दारी’ स्थगित; लवकरच नवीन तारीख, प्रशासनाची माहिती
अमरावती : ‘शासन आपल्या दारी’चा २६ नोव्हेंबरला जिल्ह्यात धडाका होता. त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग कामाला लागले असतानाच २६ ला येथील सायन्स स्कोर मैदानावर आयोजित हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. लवकरच नवीन तारीख येणार असल्याने तयारी सुरूच आहे, मात्र वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.
विभागाच्या मुख्यालयी असलेला ‘शासन आपल्या दारी’ अभियानासाठी किमान पाच कोटींचा खर्च अपेक्षित होता. यासाठी डीपीसीमधून तरतूद करण्याच्या सूचना यापूर्वीच शासनाने दिल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्य यांनी प्रत्येकी २० लाखांचा निधी उपलब्ध करावा, यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा पत्रदेखील देण्यात आलेले आहे. या अभियानाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाने जय्यत तयारी केली होती. त्या उत्साहावर आता विरजण पडले आहे.
या कार्यक्रमासाठी काही निविदा काढण्यात आल्या व या कंत्राटदारांनी तयारीदेखील सुरू केली होती. कार्यक्रम स्थगित झाल्याने ही कामे देखील थांबली आहे. डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.