धनेगाव येथील संत्राउत्पादकापाठोपाठ मोठ्या भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST2020-12-24T04:13:07+5:302020-12-24T04:13:07+5:30
अंजनगाव सुर्जी : संत्री विक्रीत फसवणूक आणि पोलिसांकडून मारहाणप्रकरणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या ...

धनेगाव येथील संत्राउत्पादकापाठोपाठ मोठ्या भावाचा मृत्यू
अंजनगाव सुर्जी : संत्री विक्रीत फसवणूक आणि पोलिसांकडून मारहाणप्रकरणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या धनेगाव येथील शेतकऱ्यापाठोपाठ त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. अंत्यविधीच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे तालुक्यातील धनेगाव येथे शोककळा पसरली आहे.
धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार (५५) यांनी शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकली होती. त्यांना सदर व्यापाऱ्यांनी शेतामध्ये दारू पाजून संत्रा विक्रीचे पैसे न देता, पावतीवर जबरदस्तीने सही घेतली व मारहाण केली. पोलीस पाटलांसमवेत अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी तक्रार देण्यास गेलेले अशोक भुयार यांना तेथे बीट जमदार व ठाणेदार यांनी मारहाण केली. त्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहिलेल्या मृत्युपूर्व चिठ्ठीत उल्लेख करून अशोक भुयार यांनी बोराळा शिवारात गणपती मंदिराच्या परिसरातील एका शेतात २२ डिसेंबर रोजी विष प्राशन केले.
अंत्यविधी सुरू असताना मोठे भाऊ संजय भुयार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे
गावातील वातावरण तापले आहे. मृत अशोक भुयार यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्यायाची अपेक्षा केली होती. आता पाठोपाठ भावाचाही मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात ना. कडू काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------
व्यापाऱ्याला सोडले, शेतकऱ्याला मारहाण
मृत अशोक भुयार यांनी तक्रार नोंदवन्यास विनंती केली तेव्हा संत्रा व्यापारी शेख अमीन याला ठाणेदार राठोड यांनी ठाण्यात बोलावून घेतले व परत पाठविले. अशोक भुयार यांनी याबाबत ठाणेदारांना जाब विचारले असता, दमदाटी करीत बीट जमादार दीपक जाधव याने मारहाण केली. तेव्हापासून घरी न परतलेले अशोक भुयार यांचे प्रेतच कुटुंबीयांना मिळाले.
----------------
सीसीटीव्हीत पोलखोल
अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी पोलीस ठाण्याचा सीसीटीव्ही तपासला तेव्हा मारहाणीच्या तक्रारीत तथ्य आढळले. याप्रकरणी मृत अशोकचा मुलगा गौरव (२५) याच्या फिर्यादीवरून बीट जमादार दीपक श्रावण जाधवसह व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.