भरधाव दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली
By Admin | Updated: June 29, 2017 00:28 IST2017-06-29T00:28:57+5:302017-06-29T00:28:57+5:30
भरधाव दुचाकी उड्डाणपुलावरील कठड्यावर धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

भरधाव दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली
दोघे जखमी : राजापेठ ते इर्विन मार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव दुचाकी उड्डाणपुलावरील कठड्यावर धडकून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या राजापेठ ते इर्विन चौक ते राजापेठ उड्डाणपूलावर घडली. नागरिकांनी दोन्ही जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले.
गोपालनगरातील रहिवासी जीवन घोरसाट (२६) व त्याचा मित्र हे दोघेही एम.एच.-२७ बी.यू.-०१९२ ने राजापेठकडून इर्विन चौकमार्गे उड्डाणपूलावरून जात होते. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही दुचाकीसह उड्डाणपुलाच्या कठड्यावर जाऊन धडकले. धडक इतकी जबरदस्त होती की लोखंडी कठड्याचे दोन अँगल तुटले. या अपघातात जीवन घोरसाट यांच्या हाताची दोन बोटे सुद्धा तुटली आहेत. अपघातानंतर उड्डाणपुलावर मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यावेळी त्यामार्गाने जाणारे कार्तीक शास्त्रकार व खांडेकर या दोघांनीही जखमी जीवन घोरसाटला उचलून त्यांच्या चारचाकी वाहनात टाकले आणि तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले तर जीवनच्या मित्राला रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहोचला. वृत्त लिहेस्तोवर पुढील चौकशी पोलिसांनी आरंभली होती.