बुडीत क्षेत्रात महिला भक्तनिवासाचे भूमिपूजन
By Admin | Updated: September 15, 2015 00:08 IST2015-09-15T00:08:20+5:302015-09-15T00:08:20+5:30
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.

बुडीत क्षेत्रात महिला भक्तनिवासाचे भूमिपूजन
सावंगा विठोबातील प्रकार : पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
लोकमत विशेष
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. या तीर्थक्षेत्रातील महिला भक्तनिवासाकरिता जि.प.ने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. त्यातून भक्तनिवासाचे भूमिपूजनही झाले. मात्र, भक्तनिवासासाठी नदीच्या बुडीत क्षेत्रात जागा निवडल्याने याबाबत देवस्थान समितीने पालकमंत्री खासदारांकडे लेखी तक्रार केली होती. पालकमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुढीपाडव्याला श्रीक्षेत्र सावंगा येते मोठी यात्रा भरते. येथे लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात. संपूर्ण राज्यातून येथे भक्तांचा राबता असतो. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय असतो. परंतु येणाऱ्या महिला भक्तांसाठी निवासाची सोय नसल्याने त्यांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन येथे महिला भक्तनिवास बांधण्याकरिता जिल्हा परिषदेने ६५ लाखांचा निधी मंजूर केला. परंतु प्रत्यक्षात जी जागा महिला भक्तनिवासासाठी निवडली गेली ती नदीच्या काठावर आहे. त्यामुळे तेथे पुराचा धोका संभवतोे. यात महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न कोठेही लक्षात घेतलेला नाही.
परिणामी, बुडीत क्षेत्रातील जागा रद्द करून ग्रामपंचायतीसमोरील जागेत महिला भक्तनिवासाचे बांधकाम करावे, अशी मागणी देवस्थान व्यवस्थापन समितीने केली पालकमंत्री पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मुख्य कार्यपालन अधिकारी व कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंत्याला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मागणी करणाऱ्यांमध्ये देवस्थानचे अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, संचालक बबनराव चौधरी आदींसह शेकडो भक्तांचा समावेश आहे.
निधीचा विनियोग गांभीर्याने करावा
शासनाकडून लोकोपयोगी निधी मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींची नेहमीच धडपड असते. परंतु या निधीचा उद्देश, बांधकामाचे ठिकाण व बांधकाम करणाऱ्या एजन्सीचा गांभीर्याने विचार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केला तरच हे महिला भक्तनिवास लोकोपयोगी ठरेल, अशी परिसरात चर्चा आहे.
सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखो भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामध्ये महिला भक्तांचा मोठा सहभाग असतो. महिला भक्त बाहेरगावच्या असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिला भक्तनिवास गावाच्या मध्यभागी असावे.
- गोविंद राठोड, श्रीकृष्ण देवस्थान, सावंगा विठोबा