भय्यासाहेब ठाकूर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:57 IST2018-07-07T11:55:48+5:302018-07-07T11:57:19+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भय्यासाहेब ठाकूर अनंतात विलीन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ कन्या व तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर, कनिष्ठ कन्या संयोगिता निंबाळकर तसेच नातू यशवर्धनसह अन्य नातवंडांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राज्यातूनच नव्हे, तर अन्य राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांना चाहणाऱ्या हजारोंच्या जनसागराने यावेळी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.
भय्यासाहेबांचे बुधवारी रात्री मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यानंतर गुरुवारी रात्री अमरावती येथील गणेडीवाल ले-आऊटमधील घरी त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता भय्यासाहेबांचे पार्थिव गुरुकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ आणले व लगेच मोझरी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले. तेथे सकाळपासून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतले. मोझरी येथील त्यांच्या शेतात (शिंदी पांडी) दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्यासह दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून भैयासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रसंताच्या भजनांद्वारे भावनांना वाट मोकळी
भय्यासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असता, त्यांच्या चाहत्यांनी राष्ट्रसंताची भजने गाऊन भावनांना वाट मोकळी केली. अंत्यदर्शनाला पालकमंत्री प्रवीण पोटे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. आनंदराव अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप, आ. आशिष शेलार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार केवलराम काळे, साहेबराव तट्टे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, प्रदेश महिला काँगे्रस अध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हा काँगे्रस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख, एसडीओ विनोद शिरभाते, तहसीलदार राम लंके यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अधिकारी व हजारो चाहते उपस्थित होते. गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.