भाऊसाहेब म्हणाले, ‘बलराम तूच सांभाळ’!
By Admin | Updated: February 4, 2016 00:16 IST2016-02-04T00:16:07+5:302016-02-04T00:16:07+5:30
देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले.

भाऊसाहेब म्हणाले, ‘बलराम तूच सांभाळ’!
बलराम जाखडांचा ऋणानुबंध : ‘भारत कृषक समाज’ची सोपविली सूत्रे
लोकमत विशेष
अमरावती : देशाचे माजी कृषिमंत्री तथा भारत कृषक समाजाचे आश्रयदाते बलराम जाखड यांचे बुधवारी निधन झाले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बलराम जाखड यांच्या हाती भारत कृषक समाजाची सूत्रे मोठ्या विश्वासाने सोपविली होती. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या विचारांना अनुसरूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य आहे, असे विचार उघडपणे मांडणारे बलराम जाखड दोन वेळा अंबानगरीत आले. मात्र, सन २००३ सालची त्यांची अमरावतीला दिलेली भेट शेवटची ठरली.
भारत कृषक समाजाचा विदर्भव्यापी मेळावा स्थानिक सांस्कृतिक भवनात २ आॅक्टोबर २००३ साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दलचा अत्यांतिक आदर आणि जिव्हाळा यावेळी त्यांच्या भाषणातून झळकत होता.
भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातही उपस्थिती
अमरावती : डॉ. भाऊसाहेबांनी भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जपले. मात्र, अंतिम समयी त्यांनी समाजाची सूत्रे ‘बलराम तू सांभाळ’ असे सांगत जाखड यांच्या स्वाधिन केली होती. या मेळाव्यात खुद्द बलराम जाखड यांनी हा प्रसंग सांगितला होता. याचवेळी आयोजित कार्यक्रमात जाखड यांनी पंचवटी चौकातील डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यपाल प्रभा राव, सुरेंद्र भुयार, अण्णासाहेब वाटाणे, भारत कृषक समाजचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे उपस्थित होते. त्यांची ही अमरावती भेट शेवटची ठरली. बलराम जाखड यांचा डॉ. भाऊसाहेब देशमुखांमुळे अंबानगरीशी एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. प्रत्यक्ष उक्ती आणि कृतीतून तो त्यांनी जपला. सन १९९८ साली डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यालाही बलराम जाखड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला शरद पवार, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव यांचीही उपस्थिती होेती.