भापकीला २२ वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 18, 2014 23:15 IST2014-05-18T23:15:56+5:302014-05-18T23:15:56+5:30
अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या वरुड तालुक्यातील भापकी या गावाला गेल्या २२ वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा लागली आहे.

भापकीला २२ वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा
वरुड : अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या वरुड तालुक्यातील भापकी या गावाला गेल्या २२ वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा लागली आहे. जनप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या गावातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. भापकी हे जवळपास ५०० लोकवस्तीचे गाव; येथे २५० ते ३०० मतदारसंख्या आहे. ३०० वर्षांची परंपरा जोपासणार्या या गावाचा विकास राजकारणामुळे रखडला आहे. वर्ष १९९१ मध्ये आलेल्या महापुरात गावात पाणी शिरले होते. अप्परवर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात हे गाव येत असल्याने अनेक वर्षे हे गाव धरणग्रस्त की पूरग्रस्त, असा तिढा कायम होता. गावाचे पुनर्वसन होणार म्हणून येथील सुविधा बंद करण्यात आल्या. लोणी रस्त्यावर भापकीचे पुनर्वसन करण्यात आले. येथे सन २००९-१० मध्ये ग्रामपंचायत कार्यालयासह सार्वजनिक सुविधा जसे नाल्या, रस्त्यांची निर्मिती पुनर्वसन विभागाकडून करण्यात आली. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याने रस्ते आणि नाल्या पुुनर्वसनापूर्वीच नेस्तनाबूत झाल्या. जुन्या भापकीतील नागरिक आजही येथे येण्यास इच्छुक नाही. यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला. ३०० वर्ष पुरातन भापकी या गावात शेतकरी, शेतमजूर तसेच जमीनदारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. दशकापूर्वी या गावामध्ये एसटीसुद्धा पोहोचलेली नव्हती. यामुळे दळणवळणाची समस्या होती. कालांतराने येथे एसटी सुरु झाली. परिणामी विद्यार्थ्यांसह, ग्रामस्थांची सोय झाली. १९८२ मध्ये अप्परवर्धा धरणाच्या मुहूर्तमेढीपासून पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकला होता. तेव्हा अर्ध्या गावाचे जुन्या गावालगत पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर ३१ जुलै १९९१ मध्ये पुराचा जबर फटका बसला. या गावाला महापुराने वेढले होते. ग्रामस्थांनी कसाबसा आपला जीव वाचविला. अप्परवर्धा प्रकल्पाचे ‘बॅक वॉटर’ गावाच्या पायथ्याशी असते. भापकीवासीयांचा समावेश प्रकल्पग्रस्तांमधून पुन्हा पूरग्रस्तांमध्ये करावे लागले. यावेळी तालुक्यातील लहान-मोठया गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भापकी मात्र अद्यापही पुनर्वसनापासून वंचित आहे. आज ना उद्या गावाचे पुनर्वसन होईल, अशी प्रतीक्षा ग्रामस्थ करीत आहेत. वर्ष २००४ मध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी हर्षवर्धन देशमुख आणि तत्कालीन पं.स. सभापती कमलाकर पावडे यांनी पुनर्वसनाचा मुद्दा लावून धरला. ग्रामपंचायतींकडून पुनर्वसनाचा ठराव घेऊन या गावाचे पूरग्रस्त म्हणून पुनर्वसन मंजूर करण्यात आले. या गावापासून बेलोरा- लोणी रस्यावर एक किमी अंतरावर वर्ष २००९-१० मध्ये भापकी पुनर्वसन तयार करण्यात आले. येथे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, सार्वजनिक शौचालय, नाल्या, रस्ते, नळाचे स्टँडपोस्ट लावून दोन अडीच वर्षांचा कालावधी उलटला. यावर ७० ते ७५ लाख रुपयांचा खर्च केला. परंतु हा खर्च निरर्थक ठरला आहे. नाल्या फुटल्या, रस्ते खचले. परंतु येथील नागरिकांना निवास कसे उभारावे, हा प्रश्न असून शासनाकडून अनुदान मिळावे, अशी अपेक्षा आहे. अद्यापही या गावातील नागरिक पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरित झाले नाहीत. त्यामुळे स्मशान शांतता असलेल्या या पडीक पुनर्वसनातील शाळा मद्यपीचे आश्रयस्थान बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)