वरूडमधील हरित पट्टा भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST2021-02-12T04:12:46+5:302021-02-12T04:12:46+5:30
झाडे मोजत आहे शेवटच्या घटका : कंत्राटदाराचे दुर्लक्ष वरूड : शहर सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने नगर परिषदेने वैशिष्टपूर्ण योजनेतून राष्ट्रीय ...

वरूडमधील हरित पट्टा भकास
झाडे मोजत आहे शेवटच्या घटका : कंत्राटदाराचे दुर्लक्ष
वरूड : शहर सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने नगर परिषदेने वैशिष्टपूर्ण योजनेतून राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक आणि शहरातील हरित पट्टयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. नागपुरस्थित एका कंपनीशी त्यासाठी ६६ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा करारदेखील झालेला आहे. त्यात वृक्षलागवडीसह तीन वर्षांची देखभाल आणि संवर्धन अनिवार्य आहे. परंतु सहा महिन्यांतच लागवड केलेल्या वृक्षांची दुर्दशा झाली आहे. पाण्याअभावी ती झाडे अखेरच्या घटका मोजत आहे.
नगरपरिषदेने दुभाजकांमध्ये वृक्षलागवडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी घेतली. त्याअनुषंगाने अमरावती रोड शासकीय गोडाऊनपासून विश्रामगृह, बस स्थानक, मुलताई चौक, पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक, रामदेवबाबा मंगल कार्यालय, रिंगरोड ते साई मंदिर नागपूर रोडपर्यंत आणि शनिवार पेठ हरित पट्टा अशी वृक्षलागवड सुरू आहे. यात अडीच हजार वृक्षलागवडीचा लक्ष्यांक आहे. सदर काम ऑगस्ट २०२० पासून सुरू असून विविध जातींची १२०० वृक्ष लावण्यात आल्याचा दावा नगरपरिषदेकडून करण्यात आला.
शनिवार पेठच्या हरित पट्ट्यामध्ये लागवड केली. मात्र पाण्याअभावी ती वृक्ष सुकायला लागली. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष आहे. वृक्षलागवडीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्यानंतर सहा माहिन्यांनंतर सर्वेक्षण केले जाणार आहे. संगोपन सुरू होण्यापूर्वीच पाण्याअभावी झाडे सुकायला लागू लागली आहेत.
- नगरसेवक, पदाधिकारी बनले ठेकेदार
पालिकेचे नगरसेवकच ठेकेदार बनले तर काहींनी तर भागीदारी सुद्धा सुरु केल्याची खमंग चर्चा आहे. लाखो रुपयांचा वृक्ष लागवडीच्या कंत्राट असतानासुद्धा याबाबत पदाधिकारी बोलायला तयार नाही. वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्तेसुद्धा मौन पाळून आहे. यात काही पदाधिकारीसुद्धा सहभागी असल्याचे सांगण्यात येत असल्याने दुर्लक्ष केले जात आहे. संपूर्ण वृक्षलागवड झाल्यानंतर सर्वेक्षण करून पुढील देखभालीचा काळ सुरू होईल. यात कसूर केल्या जाणार नाही, असे नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता खाडे म्हणाले.