भूदान जमीन विक्रीची एसडीओंनी दिली परवानगी
By Admin | Updated: March 5, 2017 00:06 IST2017-03-05T00:06:49+5:302017-03-05T00:06:49+5:30
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान मिळालेल्या व भूदानयज्ञ समितीद्वारा भूमिहिनांना वाटप केलेल्या ....

भूदान जमीन विक्रीची एसडीओंनी दिली परवानगी
धक्कादायक : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील प्रकार, भूदान मंडळाने केला पट्टा रद्द, जमीन वर्ग करण्यास महसूलची टाळाटाळ
अमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान मिळालेल्या व भूदानयज्ञ समितीद्वारा भूमिहिनांना वाटप केलेल्या जमिनीची विक्री करण्याची परवानगी मोर्शी येथील तत्कालीन एसडीओंनी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा पट्टा भूदानयज्ञ मंडळाने रद्द केला असला तरी जमीन मंडळाचे नावे वर्ग करण्यास महसूल विभाग टाळाटाळ करीत आहे.
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई भाग १ येथील गट नं. १४९/१ क्षेत्र २.९५ हेक्टर आर. भोगवटदार - २ ही जमीन मोर्शी भुदान यज्ञ समितीने ८ मार्च १९५५ रोजी अहमद शा रहिमशा फकीर (रा. नेरपिंगळाई) यांना दिल्याची नोंद आहे. ही शेतजमीन अहंस्तातरणीय व विक्रीस अनुमती नसताना मोर्शी येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी १ जुलै २०१० मध्ये विक्रीची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे अधिकारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती मोर्शी येथील एसडीओ कार्यालयाने दिली. भूदानयज्ञ मंडळाच्या भूधारकाने शर्थभंग केल्यामुळे मंडळाने या जमिनीचा पट्टा रद्द केला आहे. त्यामुळे ही जमीन भूदानयज्ञ मंडळाच्या नावे वर्ग करावयास पाहिजे, याविषयी मंडळाने १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोर्शी तहसीलदारांना पत्र दिले असताना महसूल विभागाद्वारा अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही.
भूमीस्वामी खरेदी हक्काने नसीरबेग नजरुबेग याने अहमदशा याचेपासून पूर्वेकडील उत्तर-दक्षिण धुऱ्याची ०.९६ हे. आर जमीन १००० रुपयांत घेतली व ही जमीन नशिरबेग यांनी बनाबाई पांडे यांना खरेदी करून दिली व बनाबाईच्या वारसदारांनी १८ जुलैला प्रमोद सुरजुसे यांना १८ जुलै २०१४ मध्ये खरेदी करून दिली. या प्रकरणात अर्जदार अवधूत गोपाळराव पांडे यांना मोर्शीचे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी विक्रीची नियमबाह्य परवानगी दिली, हे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
‘कब्जेदार’ शब्द खोडून भूमीस्वामी अशी दुरूस्ती
या प्रकरणात भूदान धारकासाठी लिहिलेल्या कब्जेदार या शब्दाला खोडून ‘भूमीस्वामी’ अशी दुरूस्ती करण्यात आली आहे व खरेदीदारासंबंधी भूमी स्वामी खरेदी हक्काने अशी नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे बनाबाई गोपालराव पांडे यांच्या ७/१२ मध्ये भोगवट वर्ग १ असा बदल करण्यात आला व नंतर पुन्हा भोगवट वर्ग-२ अशी नोंद करण्यात आली. ‘भूदान अहस्तांतरणीय’ अशी नोंद मात्र ७/१२ उताऱ्यात घेण्यात आलेली नाही.
प्रतिबंधित जमिनीचे तीनदा हस्तांतरण
भूदानयज्ञ अधिनियम १९५३, कलम २४, खंड (सी) अन्वये हस्तांतरित प्रतिबंधित संदर्भ - १ नुसार या भूदान जमिनीचे खरेदी-व्यवहारामार्फत तीन वेळा हस्तांतरण झाले आहे. तलाठी कार्यालयाने मंडळ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नियमबाह्यरीत्या फेरफार नोंदविल्याचा भूदानयज्ञ मंडळाचा आरोप आहे.
या अधिनियमाने दिली विक्री परवानगी
शेत विक्रीसाठी अवधूत पांडे व त्यांच्या भावांच्या सामाईक मालकीची शेतजमीन विक्रीकरिता ५० टक्के रक्कम भरण्यास तयार असल्याने भोवर्ग २ ची शेतजमीन प्रमोद सुरजुसे यांना विक्री करण्याची परवानगी महा. शेतजमीन अधिनियम १९६१ व महा. शेतजमीन नियम १९७५ चे महा. शेतजमीन नियम २००१ मधील सुधारणा १२ आणि (ड १) व (ग) मधील तरतुदीनुसार एसडीओंनी जमीन विक्रीची नियमबाह्य परवानगी दिल्याचा आरोप होत आहे.
ही शेतजमीन भूदानची असतानाही भोगवटदार वर्ग २ व सिलिंग कायद्याचा वापर करून तत्कालीन एसडीओंनी विक्रीची परवानगी दिली. त्यांना भुदान अधिनियम माहीत नसणे हे धक्कादायक आहे. हा पट्टा रद्द करण्यात आला असल्याने तो मंडळाचे नावे वर्ग करण्यात यावा.
- नरेंद्र बैस, जिल्हा प्रभारी, भूदान यज्ञ मंडळ