सोशल मीडियावरील फेक न्यूजपासून सावधगिरी बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:29+5:302021-05-05T04:21:29+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या पूर्णपणे सुरक्षित अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या ...

सोशल मीडियावरील फेक न्यूजपासून सावधगिरी बाळगा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या पूर्णपणे सुरक्षित
अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असताना काही असामाजिक तत्त्वांकडून नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूजद्वारे भीती आणि दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अशा फेक न्यूजपासून सावधगिरी बाळगावी. वृत्तपत्र, दुधाच्या पिशव्या अथवा पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे हे कोरोना संसर्गाचा प्रसार करीत नसून, ती सर्व सुरक्षित असल्याची बाब जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली.
१ मेपासून १५ दिवसांसाठी नव्याने संचारबंदी लागू करण्यात आली. यादरम्यान ३० एप्रिल रोजी सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करण्यात आली. यात जिल्हा प्रशासनाचा उल्लेख करण्यात आला आहे. शेजारी जाणे बंद करा, गरम पाणी प्या, ब्रेड, पाव असे बेकरी साहित्य आणू नका, बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नका, असा संदेश व्हायरल करण्यात आला; मात्र राज्य शासनाने लॉकडाऊनसाठी नव्याने नियमावली जारी केलेली नाही. नागरिकांची गैरसाेय अथवा दहशत निर्माण होईल अशी बंधने लादण्यात आली नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजता दरम्यान सूट देण्यात आली आहे. औषध, दवाखाने, बँक, पोस्ट, पेट्रोल पंप, ॲम्ब्युलन्स आदी अतिआवश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असून, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोट
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये. कोरोना नियमावलींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.