सुपारी होती अद्दल घडविण्याची, त्यांनी अंशुलला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:09+5:302021-07-27T04:14:09+5:30
अमरावती : मोतीनगर चौकात अंशुल इंदूरकर खूनप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सोनू-मोनू या दोघा भावांनी तीन अल्पवयीनांकडून खून करवून घेतल्याची ...

सुपारी होती अद्दल घडविण्याची, त्यांनी अंशुलला संपविले
अमरावती : मोतीनगर चौकात अंशुल इंदूरकर खूनप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सोनू-मोनू या दोघा भावांनी तीन अल्पवयीनांकडून खून करवून घेतल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर घटनाक्रम उघड झाला. अंशुलला जिवे मारण्याची नव्हे, अद्दल घडविण्याची सुपारी दिली होती, असा पवित्रा आरोपी बंधूंनी घेतला आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.
मोतीनगर चौकात २५ जुलै रोजी दुपारी ५ च्या सुमारास अंशुल बाळू इंदूरकर (१९, रा. कल्याणनगर गल्ली नं ६) याचा खून झाला होता. याप्रकरणी फ्रेजरपुरा, राजापेठ, गाडगेनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रविवारी रात्री ११ च्या आत आरोपींना ताब्यात घेतले. पैकी अक्षय ऊर्फ सोनू प्रभुदास पवार (२५), निखील ऊर्फ मोनू प्रभुदास पवार (२२, रा. दोन्हीही कल्याणनगर) व दीप नीलेश कपिले (१९) या तिघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी मृताचा भाऊ ओम इंदूरकर (१८) याच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, १०९, ११४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वडिलांना चिडविल्याने अंशुलने दोन महिन्यांपूर्वी सोनू व मोनू यांना थापडा मारल्या होत्या. त्या वादातून आपल्या भावास जिवे मारण्यात आले, अशी तक्रार ओमने नोंदविली.
असा घडवून आणला खून
मारेकरी तीन अल्पवयीन मुले ही शिवशक्तीनगर, शिवाजीनगर व गणेशनगर येथील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास एका अल्पवयीनाने दुसऱ्या मुलाच्या फोनवरून अंशुलला कटिंग करण्यासाठी फोन केला. गाडगेनगरला असल्याने त्याने भाऊ ओमला फोन केला. मात्र, तूच मोतीनगर चौकात ये, असे अंशुलला सांगण्यात आले. त्यानुसार, काही वेळाने अंशुल हा एका मित्रांसमवेत मोतीनगर येथे पोहोचला. तेवढ्यात त्याचा मित्र लघुशंकेकरिता गेला. यादरम्यान, दीप कपिले व मोनूच्या दुचाकीवर चौघे जण आले. मोनू व दीप दूर अंतरावर उभे राहिले. तेवढ्याच तीन अल्पवयीनांनी अंशुलच्या खांद्यावर चाकूने वार केले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून ते पळून गेले.
कपिलेने आणून दिला चाकू
मोनू हा चवरेनगरला गेला. कपिलेसह त्याने तीन अल्पवयीनांची दुपारी १२ ते २ या कालावधीत भेट घेतली, तर कपिलेला चाकूची व्यवस्था करण्यास बजावले. कपिलेनेच एका अल्पवयीनाला चाकू आणून दिला.
असा लागला सुगावा
अंशुलसोबत असणाऱ्या मित्राने हल्लेखोर टकले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यावरून वेगाने सूत्रे फिरविण्यात आली. ताब्यात घेतलेल्या एका टकल्याला साक्षीदाराने ओळखले. मृताच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. त्यातील एक क्रमांक आरोपीच्या बहिणीचा निघाला. पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचले. तेथून उलगडा होत गेला. अन्य एक कॉलचे लोकेशन शिवशक्तीनगर येथे मिळाले. दोन अल्पवयीन ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात अन्य चौघांनादेखील ताब्यात घेण्यात आले. यातील दोन अल्पवयीन आरोपींनी टक्कल केले आहे. आरोपींचा समावेश असलेल्या फेसबुकवर एक ग्रुप आहे. त्या माध्यमातून काही तरुण गुन्हेगारी विश्वात वावरत असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
डीजी ऑफीसमधून फोन
२१ ते २५ जुलै या कालावधीत तीन खून झाले. त्याची दखल घेत सोमवारी सकाळी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मोतीनगरच्या खुनाबाबत विचारणा करण्यात आली.