शेवंती पुष्पप्रदर्शनीला उत्कृष्ट प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:06 IST2017-12-17T23:04:52+5:302017-12-17T23:06:06+5:30
येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम. शहा स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्यानजीक असलेल्या माजी प्राचार्य उर्मी शहा यांच्या निवासस्थानी आयोजित ....

शेवंती पुष्पप्रदर्शनीला उत्कृष्ट प्रतिसाद
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील अमरावती गार्डन क्लॅब व डॉ. एम.एम. शहा स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्यानजीक असलेल्या माजी प्राचार्य उर्मी शहा यांच्या निवासस्थानी आयोजित शेवंती प्रदर्शनीत नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला १७ व १८ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या शेवंती प्रदर्शनीचे उदघाटन रविवारी सकाळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.
शेवंती प्रदर्शनीत ठेवण्यात आलेल्या विविध शेवंतीच्या प्रजातींमुळे मी गदगदीत झालो. लोकांच्या जीवनात फुले आनंद फुलवितात, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. यावेळी वनस्पतीशास्त्रांच्या अभ्यासकांनीही येथे प्रदर्शनी पाहण्यासाठी धाव घेतली होती. येथे ४० प्रकारच्या विविध नाविन्यपूर्ण प्रजातींची मेजवानी अभ्यासकांना मिळाली. याप्रसंगी एम. एम. शहा स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कनक शहा, निर्मला देशमुख, गार्डन क्लॅबच्या अध्यक्ष सुचिता खोडके, सचिव रेखा मग्गीरवार, प्लॅस्टिक सर्जरीतज्ज्ञ भरत शहा, जागृती शहा, अनुराधा पाठक, नगरसेवक प्रणय कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी शेवंती फुलांच्या प्रदर्शनीला नागरिकांचा भक्कम प्रतिसाद मिळाला. सोमवारी पाचशे विद्यार्थी प्रदर्शनीची पाहणी करणार आहेत. डोरीस क्यून, चंद्रमा, किकिबोरी, टेमपेशन अशा विविध प्रकारच्या नर्सरीत तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती या प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या होत्या.
मानवाला जगण्याची नवी दिशा ते देतात. शेवंतीची प्रदर्शनी पाहणाऱ्यांच्या मनात यावेळी आनंद फुलत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अमरावतीकरांनी विविध प्रजातींची माहिती वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ तथा माजी प्राचार्य ऊर्मी शहा यांच्याकडून जाणून घेतली. वनस्पतीशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या माजी प्राचार्य यांनी तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी पाहणाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या निवासस्थानी अडीशे शेवंतीच्या प्रजाती ठेवण्यात आल्या आहे. त्यांचे आपल्या मुलांप्रमाणे त्या संगोपन करतात. त्यावर संशोधन करतात. मानवाला आॅक्सिजन देण्याचे महत्त्वाचे कार्य झाडे करीत असल्याने त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही ऊर्मी शहा यांनी आपले मत व्यक्त केले.
या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न झाले. एकाच वेळीस ४० प्रजाती या ठिकाणी बघायला मिळाल्या धकाधकीच्या जीवनात फुलांमुळे आनंद मिळतो.
- पूजा कुलकर्णी, नागरिक
नवीननवीन व्हरायटीज् बघायला मिळाल्या. ऊर्मी शहा यांचे कार्य प्रशंसनीय आहे. प्रत्येक नागरिकांनी एक तरी शेवंतीचे रोपटे घरी लावले पाहिजे.
- संजय कुलकर्णी, नागरिक, अमरावती
सोमवारी चार शाळांचे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रदर्शनी बघण्यास येणार आहेत. येथे विदेशी प्रजातींच्या शेवंती ठेवण्यात आल्या आहेत.
- ऊर्मी शहा,
पुष्प प्रदर्शनी आयोजक