उत्तमसरा ग्रामस्थांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक
By Admin | Updated: January 26, 2016 00:16 IST2016-01-26T00:16:47+5:302016-01-26T00:16:47+5:30
त्तमसरा ग्रामपंचायतीने गावातील घरांचे मोजमाप करून २३० घरांचे अतिक्रमण असल्याच्या नोटीस बजावली आहे. मात्र ग्रामपंचायतीची ही कारवाई नियमबाह्य आहे.

उत्तमसरा ग्रामस्थांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक
कारवाई नियमबाह्य : कारवाईवर स्थगितीची मागणी
अमरावती : उत्तमसरा ग्रामपंचायतीने गावातील घरांचे मोजमाप करून २३० घरांचे अतिक्रमण असल्याच्या नोटीस बजावली आहे. मात्र ग्रामपंचायतीची ही कारवाई नियमबाह्य आहे. अतिक्रमण पाडल्यास सर्व संसार उघड्यावर येतील, याला आवर घालावा, या मागणीसाठी शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या नेतृत्वात उत्तमसरा येथील ग्रामस्थांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली.
अमरावती विभागासह जिल्ह्यात अशा प्रकारची कुठलीही कारवाई ग्रामपंचायत स्तरावर सुरू नाही. गावातील घरांचे अतिक्रमणाचे सक्षम प्राधिकरणामार्फत मोजमाप करण्यात आलेले नाही. तसेच २३० पैकी ४३ नागरिकांना मालकी हक्काबाबत खरेदी खत व तत्सम कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये यांचे अतिक्रमण नाही, असे सिध्द झाले आहे. तसेच पंचायत समितीत ग्रामपंचायत कार्यालयामार्फत केलेल्या मोजणीमध्ये अनेक तफावत आढळून आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे. ही अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही नियमबाह्य असून ती तातडीने रोखण्यात यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी नाना नागमोते, शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, आशिष धर्माळे, धमेंद्र मेहरे, उमेश घुरडे, सुभाष पाटील व उत्तमसरा गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)