पाण्यासाठी बेनोडावासीयांची ग्रा.पं.वर धडक
By Admin | Updated: February 26, 2016 00:30 IST2016-02-26T00:30:41+5:302016-02-26T00:30:41+5:30
ग्रामपंचायतींतर्गत ग्रामस्थांना ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत होता ते जलस्त्रोत आटल्याने आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

पाण्यासाठी बेनोडावासीयांची ग्रा.पं.वर धडक
रोष उफाळला : आठवड्यानंतर मिळतेय पाणी, १६ गाव पाणीपुरवठा योजना कुचकामी
वरूड/बेनोडा (शहीद) : ग्रामपंचायतींतर्गत ग्रामस्थांना ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत होता ते जलस्त्रोत आटल्याने आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोणी जरुड १६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. थकीत वीज देयकांमुळे सदर योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येते. फेब्रुवारी महिन्यातच बेनोडावासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने असंतुष्ट नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर धडक देऊन रोष व्यक्त केला.
१० ते १२ हजार लोकवस्तीचे बेनोडा गाव. शेतकरी, शेतमजुरांची येथे अधिक संख्या आहे. या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याकरिता पाणीपुरवठा करणारे तीन पंप हाऊस तर दोन ग्रामपंचायतींच्या मालकीचे बोअर आहेत. १ हजार १४८ नळधारक आहेत. मात्र भूजल पातळी प्रचंड खालावल्याने दोन बोअर आणि तीन विहीरी आटल्या आहेत. यामुळे ेगावपात आतापासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांमध्ये असंतोष खदखदत असल्याने ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या खासगी बोअरवरुन पाणीपुरवठा जोडून सात दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एका माणसाला साधारणत: ४० लिटर पाणी आवश्यक असल्याने आवश्यकतेनुसार पाणी मिळत नाही. पाण्यासाठी बेनोडावासीयांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकरी, शेतमजुरांची ससेहोलपट सुरू झाली आहे.
पाण्याच्या टंचाईला कंटाळलेल्या शेकडोे महिलांसह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन तीव्र असंतोष व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कांबळे तसेच ग्रमपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मोर्चेकरी ‘पाणी द्या हो पाणी द्या, नाही तर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा देत होते. (तालुका प्रतिनिधी)