आठ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ
By Admin | Updated: July 19, 2015 00:22 IST2015-07-19T00:22:47+5:302015-07-19T00:22:47+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला.

आठ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ
शिवसेनेच्या मागणीला यश : ८४ लाखांची होणार मदत
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. त्यामुळे आठ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून पुढील आठवड्यात ८४ लाखांची मदत करण्यात येणार आहे़
मागील दोन वर्षा पासून धामणगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहे़ पीक विमा काढल्यानंतर या शेतकऱ्यांना कोणत्याच पध्दतीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे माजी आमदार अरूण अडसड यांनी कृषी तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पत्राद्वारे या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या गत महिन्यात मांडल्या होत्या़
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबा ठाकूर यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर पीक विम्याबाबत होणारा अन्याय मांडून अनेक पुरावे ठाकूर यांनी महसूल राज्यमंत्र्यांना दिले़ जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देऊन त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची कैफियत मांडली होती़ याचे फलित झाल्याचे समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)