नांदगावातील बेंबळा, साखळी नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:34+5:302021-09-08T04:17:34+5:30

अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान, नांदगाव ते जावरा दरम्यान पुलावरून दहा फूट पाणी, ठिकठिकाणी वाहतूक बंद नांदगाव खंडेश्वर : सोमवारी ...

Bembala in Nandgaon, flooding the Sakhali river | नांदगावातील बेंबळा, साखळी नदीला पूर

नांदगावातील बेंबळा, साखळी नदीला पूर

अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान, नांदगाव ते जावरा दरम्यान पुलावरून दहा फूट पाणी, ठिकठिकाणी वाहतूक बंद

नांदगाव खंडेश्वर : सोमवारी रात्री झालेल्या पावसाने तालुक्यात बेंबळा, साखळी नदीला पूर आला. परिणामी सकाळी ६ पासून दोन्ही नद्या पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत. नांदगाव ते जावरा दरम्यान पुलावरून दहा फूट पाणी वाहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. शेतकऱ्यांच्या शेतातील तूर, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसाच्या परिणामी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील गावागावांतील नाल्याला ही पूर आला. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने नुकसान झाले. शिवणी रसुलापूर येथील केशवराव तांदूळकर, पुरुषोत्तम बनसोड यांच्या शेतात ठेवलेले स्पिंकलरचे पाईप पुरात वाहून गेले. वीज व वादळाने सहा झाडे कोलमडल्याची शिवणी रसुलापूर येथील चंद्रशेखर महाराज वैद्य यांनी सांगितले.

पहूर येथील बेवडा नदीच्या पुलावरून सुमारे दहा फूट पाणी वाहत होते. त्यामुळे नांदगाव-जावरा-वेणी गणेशपूर मार्ग बंद पडला. गावातील महादेव मंदिरालाही पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. नदीकाठच्या शेतातील शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले, असे पहूरचे शेतकरी मोरेश्वर भेंडे सांगितले. धानोरा गुरव ते वाढोणा रामनाथ मार्गावरील नांदसावंगी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती, असे धानोरा गुरव चे उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी सांगितले. नांदगाव ते जावरा दरम्यानच्या पुलावरून सुमारे दहा फुटाच्या वर पाणी वाहत असल्याने नांदगाव, जावरा, खंडाळा, रोहना हा मार्ग बंद झाला होता. नांदगाव तालुक्यात गेल्या २४ तासांत १०२.६ मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्या काठचे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले तसेच खोलगट शेतात पावसाचे पाणी साचले.

070921\img20210907112208.jpg

बेंबळा, साखळी नदीला पूर.

Web Title: Bembala in Nandgaon, flooding the Sakhali river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.