बेलोरा विमानतळाचा विकास मंदावला
By Admin | Updated: June 27, 2015 00:17 IST2015-06-27T00:17:26+5:302015-06-27T00:17:26+5:30
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळ विकासाच्या हालचाली मंदावल्या आहेत.

बेलोरा विमानतळाचा विकास मंदावला
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळ विकासाच्या हालचाली मंदावल्या आहेत. शासन, प्रशासन स्तरावर विमानतळाच्या फाईलवर धूळ साचली असल्याने खरचं विमानतळाचा विकास होईल काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेलोरा विमानतळाच्या विकास होणार. त्याकरिता निधी कमू पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. बेलोरा विमानतळाहून प्रवासी सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरही विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. एकीकडे विमानतळाचा विकास, विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी जागा ताब्यात घेतल्यानंतरही विमानतळाचा विकास होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीची नाराजी पाहावयास मिळत आहे. जिल्हा विकासापासून माघारला असताना विमानतळाचा विकास झाल्यानंतर नवे उद्योगधंदे उभारुन काहीतरी रोजगाराचा वाटा उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, विमानतळाचा विकास आणि विस्तार हे कागदावरच आहे. त्यामुळे जमिनींचे अधिग्रहण कोणासाठी असा सवाल विचारला जात आहे. आघाडी शासन जावून युती शासन सत्तेवर आल्यानंतर बेलोरा विमानतळाच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु नव्या शासनाकडून काहीही हालचाली होत नसल्याची माहिती आहे. विमानतळाच्या विकासात आडकाठी ठरणाऱ्या यवतमाळ - अकोला या चार कि. मी. वळण मार्गाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असताना अद्यापपर्यंत हा रस्ता निर्माण करण्यात आला नाही. यापूर्वी विमानतळाची ७४ हेक्टर जमीन होती. परंतु नव्याने ३०० हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणात नव्याने टॉवर, रन-वे, प्रशासकीय इमारत आदी बाबींचा समावेश आहे. निधी उपलब्ध नसल्याने विकास कामांना सुरुवात करणे अशक्य असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. शासनाकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. विमान प्राधिकरणाच्या चमूने पाहणी देखील केली आहे. परंतु निधी अभावी विकास कामे करता येत नाही.
-एम.पी. पाठक,
प्रबंधक, बेलोरा विमानतळ